Published on
:
05 Feb 2025, 12:31 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:31 am
बार्शी : दुचाकी मुरमाच्या खड्यावरून घसरल्याने दोन तरुण फोटोग्राफरचा दुर्देवी अंत झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 4) मध्यरात्रीच्या सुमारास बार्शी ते येडशी राष्ट्रीय महामार्गावर पांगरी जवळील श्री नीलकंठेश्वर मंदिरालगत घडला. सुरज पांडुरंग माळी (वय 19, रा. पांगरी) व रवीकिरण रवींद्र शिंदे (वय 25, रा. चिंचोली, ता. बार्शी) अशी अपघातात उपचारापूर्वीच मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. सुयश सुहास शिंदे (वय 26, रा. चिंचोली) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे.
नीलकंठेश्वर मंदिराजवळील चौधरी यांच्या शेताजवळ त्यांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने गाडी थांबवून पाहणी केली असता, तो जखमी पांगरी येथील त्यांच्या ओळखीचा सूरज माळी असल्याचे लक्षात आले. जवळच काही अंतरावर त्यांची मोटारसायकल (एमएच 13 ईक्यू 8658) पडलेली होती. बाजूलाच रवीकिरण शिंदे जखमी अवस्थेत पडलेला होता. शिंदे यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून दोघांना स्थानिक नागरिक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने पांगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
सध्या या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यावर साईड पट्ट्यावरील मुरूम भरण्याचे काम सध्या सुरू असल्यामुळे मुरमाचे ढिगारे टाकण्यात आलेले होते. त्यावरून गाडी घसरल्याने हा अपघात घडला. मृत माळी हा बीसीए द्वितीय वर्गात शिक्षण घेत होता. दोघेही एकुलते एक मुले होती. या घटनेची नोंद पांगरी पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस कर्मचारी गणेश दळवी हे करत आहेत.
कुसळंब ते येडशी या राष्ट्रीय महामार्गावर पांगरीसह इतर ठिकाणी तातडीने गतिरोधक करण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे वाहने सुसाट धावत असल्याने अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतिरोधक तातडीने न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.