हडपसर भागात वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका वाहतूक पोलिसाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक फेकून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. यामध्ये संबंधित कर्मचारी जखमी झाले आहेत, तर घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस हवालदार राजेश नाईक (47) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश नाईक फुरसुंगी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी सायंकाळी भेकराईनगर चौकात वाहतूक नियमाचे कर्तव्य करीत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुचाकीवर जाणारा व्यक्ती फोनवर बोलत दुचाकी चालवत होता. नाईक यांनी त्याला गाडी चालवताना फोनवर बोलू नको, असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने नाईक यांना शिवीगाळ करत वाद घातला. वाद विकोपाला गेल्यावर तरुणाने हमरी-तुमरीवर येऊन रस्त्याच्या बाजूला पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात मारला. घटनेनंतर दुचाकीस्वार पसार झाला आहे.