![naxal-attack naxal-attack](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/10/naxal-attack-696x447.jpg)
नक्षलवाद्यांनी क्रुरतेची हद्दच पार केली आहे. किरंदुल अरणपूर येथील भाजपचे सरपंचपदाचे उमेदवार जोगा राम यांची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली आहे. अरणपूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शेकडोंच्या संख्येने आलेल्या नक्षलवाद्यांनी ही हत्या केली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आधी संपूर्ण गावाला घेराव घातला आणि नंतर सर्वांच्या घरातील लाईट बंद केल्या. त्यानंतर सरपंच जोगा यांच्या घरी पोहोचले, मात्र जोगा यांच्या पत्नीने दार उघडले नाही तेव्हा त्यांनी दरवाजा तोडून घरात घुसले आणि पत्नीसमोरच पतीची हत्या केली. जोगाच्या मुलाला दुसऱ्या खोलीत बंद केले होते. त्यावेळी 6 नक्षलवादी त्यांच्या घरात घुसले होते. त्यावेळी सरपंचाची पत्नी लक्ष्मीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण दोन नक्षलवाद्यांनी तिला बंदी बनवले होते. तर इतर 4 नक्षलवाद्यांनी जोगा यांची निर्घृण हत्या केली. जोगा गेल्या 25 वर्षांपासून अरणपूर पंचायतीचे सरपंच होते. अरणपूर पंचायतीत जेव्हा जेव्हा महिलांची जागा असायची तेव्हा त्यांची पत्नी निवडणूक लढवायची आणि जेव्हा ती जागा मोकळी व्हायची तेव्हा जोगा निवडणूक लढवायचे.
नक्षलवादी भेदरले असून ते निष्पाप लोकांना मारत आहेत. बाहेरील नक्षलवादी या भागात आलेले नाहीत. हे स्थानिक नक्षलवाद्यांचे काम आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच नक्षलवाद्यांना पकडले जाईल असे दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक गौरव रॉय यांनी सांगितले.