धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडू:अजित पवारांना सर्व पुरावे दिलेत, त्यांना अजून काय पाहिजे? अंजली दमानिया यांचा घणाघात

12 hours ago 1
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे व मकोका अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडमध्ये आर्थिक संबंध आहेत. यासंबंधीचे सर्व पुरावे आम्ही अजित पवारांना दिलेत. अजून त्यांना काय पाहिजे? धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा दिला नसेल तर आम्ही त्यांना तो देण्यास भाग पाडू, असे त्या म्हणाल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बीडमधील कथित गुन्हेगारी संपवण्याच्या दृष्टिकोनातून तेथील नेत्यांना चांगलेच झापले. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुरावे देऊनही कारवाई होत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट अजित पवारांना आणखी काय तथ्य हवे आहे? त्यांना तिथे ज्या काही घटना घडल्या त्या कळल्या, मी एवढे देखील दाखवून दिले की, वाल्मीक कराड हा काही त्यांचा केवळ कार्यकर्ता नाही. त्यांच्यात आर्थिक संबंध आहेत. त्यांच्या कंपन्या व जमिनी एकत्र आहेत. धनंजय मुंडे यांनी केलेले भ्रष्टाचार अनेक लोकांनी उघड केलेत. मी स्वतः तर कागदोपत्री पुरावे दिलेत. त्यानंतरही कारवाई होत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडे स्वतःला निर्दोषच मानणार. आजपर्यंत एखाद्या खुन्याने मी खून केल्याचे सांगितले आहे का? तो मी खून केला नाही असेच म्हणतो. या प्रकरणात ते सरळ सरळ दोषी आहेत. पुरावे देखील त्यांच्याविरोधात आहेत. पण अजून जर राजीनामा होत नसेल तर आम्ही त्यांना तो देण्यास भाग पाडू, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. पण आता देशमुख यांच्या हत्येचा कटच मुळात वाल्मीक कराडने रचल्याचा दावा केला जात आहे. वाल्मीक हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मी काही साधू संत वगैरे नाही दुसरीकडे, बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच त्यांना गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. जी कामे माझ्या स्तरावर आहेत, ती मी करेन, पण जी कामे मुख्यमंत्र्यांचा स्तरावरील आहेत, ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन. असे करताना मी स्थानिक लोक प्रतिनिधींनाही विश्वासात घेईन. सध्या मंत्रिमंडळात तुमच्या भागातील दोन सहकारी आहेत. एक धनंजय मुंडे आणि दुसऱ्या पंकजाताई. त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ. कामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पण मी जर भदेभाव करत नसेन, तर मी ज्यांची कामे करतोय त्यांनीही भेदभाव केला नाही पाहिजे. नाहीतर मी त्यांचे काम करणार आणि ते खाली तिसरेच काहीतरी करणार, असले मी खपवून घेणार नाही. मी सरळ सांगणार तुमचे हे दुटप्पी वागणे असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू-संत नाही. मी सरळ मार्गी आहे, असे अजित पवार म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article