Published on
:
23 Jan 2025, 2:00 pm
Updated on
:
23 Jan 2025, 2:00 pm
धुळे : सेवानिवृत्त भूमापन अधिकाऱ्याकडूनच दहा हजार रुपयाची लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात घडला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने नगर भुमापन अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे यांना लाचेची रक्कम स्वतः स्विकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदार हे नगर भुमापन अधिकारी या पदावर धुळे येथील नगर भुमापन कार्यालय येथुन सन २०१४ मध्ये सेवा निवृत्त झाले आहेत. तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मौजे महिंदळे, स.नं. १२८/२ मध्ये प्लॉट नं.२ क्षेत्र १५५ चौ.मी. दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी खरेदी केला आहे. या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र चुकीने १८५.२० चौ.मी. ची नोंद झाली असल्याने या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवर खरेदी खतान्वये नाव लावण्यासाठी अडचण येत असल्याने मिळकत पत्रिकेवरील क्षेत्राची दुरूस्ती करून मिळण्याकरीता मुळ मालक यांनी नगर भुमापन अधिकारी, यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जावर कार्यवाही होवुन नगर भुमापन अधिकारी भास्कर वाघमोडे यांनी या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने लागलेल्या क्षेत्राची दुरुस्ती करण्याबाबत कार्यालयीन आदेश काढले आहेत.
परंतु या आदेशान्वये मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती न झाल्याने तक्रारदार हे वेळोवेळी धुळे नगर भुमापन कार्यालयात जावुन नगर भुमापन अधिकारी भास्कर वाघमोडे व परिरक्षण भुमापक हर्षल खोंडे यांची भेट घेवुन पाठपुरावा करीत होते. त्या दरम्यान नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडुन १० हजार रुपये घेतले होते.
त्यानंतर तक्रारदार हे धुळे नगर भुमापन कार्यालयात त्यांच्या कामाबाबत विचारपुस करण्याकरीता गेले असता नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करुन या लाचेची रक्कम परिरक्षण भुमापक खोंडे यांना देण्यास सांगितल्याची तक्रार धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केली असता नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे परिरक्षण भुमापक हर्षल खोंडे यांच्याकरीता १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आज सापळा रचला असता नगर भुमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेची रक्कम स्वतः स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.