Published on
:
23 Jan 2025, 12:12 pm
Updated on
:
23 Jan 2025, 12:12 pm
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 645 गावे आणि 2415 वाड्यांत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरुन 41 कोटी 69 लाख 74 हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या 95 लाखांची तरतूदीचा समावेश आहे. या आराखड्यात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वांधिक 34 कोटी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हाभरात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तरीही उन्हाळ्यात एप्रिल ते जूनअखेरपर्यंत विशेषत: संगमनेर, अहिल्यानगर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यांतील काही गावे तसेच पारनेर व पाथर्डी शहरांत देखील पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 645 गावे आणि 2415 वाड्यांत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, बुडक्या खोदणे, विहिरी खोल करणे, खासगी विहिर अधिग्रहण तसेच ग्रामीण भागातील नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे आदी उपक्रम टंचाई आराखड्यात समावेश केला आहे.
ग्रामीण भागातील 496 गावे आणि 2244 वाड्यांत 30 जून 2025 पर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 33 कोटी 17 लाख 75 हजार रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी 5 कोटी 22 लाख, टँकर भरण्यासाठी 1 कोटी विहिरींचे खोलीकरणासाठी 44 लाख खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यासाठी 62 लाख 46 हजार रुपयांची आराखड्यात तरतूद केली आहे. गेल्या वर्षी 86 कोटींचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. जवळपास साडेतीनशे टँकर धावत होते.
पारनेर व पाथर्डी शहरांसाठी टँकरची तरतूद
नगरपरिषद व नगरपंचायती या शहरी भागातदेखील उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहते. त्यामुळे या संस्थाकडूनही अहवाल मागविला गेला. परंतु फक्त पारनेर नगरपंचायत व पाथर्डी नगरपरिषदेने संभाव्य पाणीटंचाई निर्माण होईल हे ग्रहीत धरून अहवाल पाठविला होता. त्यानुसार पारनेर शहरासाठी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी 50 लाख व विहिरींचा गाळ काढण्यासाठी 5 लाख रुपये तर पाथर्डी शहरासाठी 40 लाख असे एकूण 95 लाख रुपये खर्चाच्या आराखड्यास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मंजुरी दिली आहे.