जिल्ह्याने कबड्डी क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. ग्रामीण भागात अजूनही कबड्डीला प्राधान्य दिले जाते. परंतु आयुष्यभर कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंना खूप काही साध्य करता आले नाही त्यामुळे या खेळाला राजाश्रय मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी येथे केले. माहुली जहागीर येथील महालक्ष्मी गोटफार्मच्या प्रांगणात आयोजित ग्रामीण कबड्डीपटूंच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ट्रस्टच्या वतीने कबड्डीपटूंचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा. दिनेश सूर्यवंशी, माजी कबड्डी खेळाडू मारोती ढोक, गोपाल कानबाले आदी उपस्थित होते. नवयुवक क्रीडा मंडळ तळेगाव (ठाकूर) येथील कबड्डी खेळाडू सुशांत नेवारे हा कॅन्सरग्रस्त असल्यामुळे त्याला या मेळाव्यात ५००१ रुपयांची मदत करण्यात आली. त्याचबरोबर कबड्डीमध्ये जखमी झालेल्या दीपन बंड या खेळाडूला सुद्धा उपचारासाठी ५००१ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. याशिवाय विद्यार्थी मित्र मंडळ दिवानखेड यांना वाचनालयाकरिता १२ खुर्ची व ५ टेबल देण्याची घोषणा विवेक गुल्हाने यांनी केली. मेळाव्यात ग्रामीण भागातील २७ कबड्डी संघातील तब्बल ४६५ कबड्डी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या वेळी ग्रामीण कबड्डी खेळाडूंनी त्यांना जाणवणाऱ्या अडचणी, व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्ष व सचिव तसेच प्रतिनिधी यांचा सत्कार करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शिवाय दरवर्षी अशा प्रकारच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विवेक गुल्हाने यांनी स्पष्ट केले. अनेक खेळाडू पोलिस विभागात हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच भरीव कामगिरी करण्यात येते. ट्रस्टचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी खेळाडूंना क्रीडा साहित्याची मदत केल्यामुळे अनेक खेळाडू पोलिस विभागात रुजू झालेत. कबड्डी खेळाडूंना ट्रस्टची नेहमी मदत होते त्यामुळे अनेक खेळाडू आज विविध क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत. शिवाय विभाग व राज्यस्तरावर सुद्धा खेळाडूंनी सामन्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)