Published on
:
15 Nov 2024, 1:35 pm
Updated on
:
15 Nov 2024, 1:35 pm
भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसमधील आंबेडकरी विचारधारा असलेल्या उमेदवाराला मिळणे अपेक्षित होते. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जातीयवाद करुन आंबेडकरी कार्यकर्त्याला संधी दिली नाही. काँग्रेसला मतांसाठी आंबेडकरी समाज पाहिजे. परंतु राजकारणात संधी देण्यासाठी नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या या भूमिकेचा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, प्राचार्य पूरण लोणारे, प्राणहंस मेश्राम, अॅड. निलेश डहाट, प्रज्ञा नंदेश्वर, भीमराव मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत निषेध केला.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना परमानंद मेश्राम म्हणाले, अनेक दशकांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंबेडकरी समाजविरोधी भूमिका घेत आहेत. परंतु, इतक्या वर्षानंतरही आंबेडकरी समाज पटोलेंचे षडयंत्र समजू शकला नाही. जगाने दखल घेतलेल्या खैरलांजी हत्याकांडावेळी पटोले यांनी खैरणा ते खैरलांजी अशी पदयात्रा काढून आंबेडकरी समाजाविरोधी भूमिका घेतली होती. काँग्रेसला आंबेडकरी समाजाची मते हवी आहेत. परंतु, या प्रवर्गाला नेतृत्व देण्याची संधी मिळते तेव्हा काँग्रेस ती संधी नाकारते. डोक्यावर संविधान ठेवून आंबेडकरी समाज काँग्रेसला साथ देईल, असा भ्रम काँग्रेसला झाला आहे. परंतु, आमची संधी नाकारणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
भंडारा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती प्रवर्गाचे मतदार ९० हजारांपेक्षा अधिक आहेत. परंतु, आंबेडकरवादी विचारधारा असलेल्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देत नाही. फक्त जातीय राजकारण करुन विशिष्ट जातीला नाना पटोले जवळ करतात, अशा जातीयवादी नेत्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम यांनी केले.