Published on
:
16 Nov 2024, 9:08 am
Updated on
:
16 Nov 2024, 9:08 am
अटीतटीच्या लढतीत आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वसाधारणपणे अधिकाधिक मते आपल्या उमेदवारास मिळण्याकरिता राजकीय पक्षांकडून प्रयत्न करण्यात येतात; मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाच्या नावाशी साधर्म्य असणारा वा त्याच नावाचा एक वा अनेक उमेदवार रिंगणात उतरून त्याची मते बाद करून आपल्या उमेदवाराच्या मतदानाचा टक्का वाढवण्याची राजकीय क्लृप्ती रायगड जिल्ह्याच्या राजकारणात जणू वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. या आगळ्या क्लृप्तीला रायगड जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष, मुरब्बी राजकारणी व माजी मंत्री स्व. अॅड. दत्ताजीराव खानविलकर यांनी सन 1991च्या लोकसभा निवडणुकीत जन्म दिला. त्यास यंदा तब्बल 33 वर्षे होत असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ही राजकीय क्लृप्ती अनेक मतदारसंघांत वापरण्यात आली आहे.
रिंगणात सन १९९१ च्या तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲड. दत्ता पाटील आणि शिवसेनेचे सतीश प्रधान अशी अत्यंत मातब्बर उमेदवारांची तिरंगी लढत होती. त्यावेळी ॲड. खानविलकर हे अंतुले यांचे प्रचार प्रमुख होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या अर्ध्या तासात ॲड. खानविलकर यांनी दत्ता पाटील शेतकरी या नामसाधर्म्याच्या उमेदवाराचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आणि सर्वच राजकीय पक्षांना मोठा धक्काच दिला. दोन दत्ता पाटील एकाच रिंगणात याची त्यावेळी राज्यभरात मोठी चर्चा झाली. त्या निवडणुकीत अंतुले यांना २ लाख १९ हजार ६३९ मते मिळून विजयी झाले. शेकापचे ॲड. दत्ता पाटील यांना १ लाख ७९ हजार ९३३ तर नामसाधर्म्याचे अपक्ष उमेदवार दत्ता पाटील शेतकरी यांना १५ हजार ६४५ मते मिळाली, ती शेकाप उमेदवार ॲड. दत्ता पाटील यांच्या पारड्यातील होती. त्यानंतर ही क्लृप्ती रायगडात आजतागायत सुरू आहे.
२००४ साली विधानसभा निवडणुकीत अलिबाग मतदारसंघात याच क्लृप्तीचा विधानसभेसाठी प्रथमच वापर झाला. यावेळी शेकापकडून मीनाक्षी पाटील, तर काँग्रेसकडून मधुकर ठाकूर रिंगणात होते. या वेळी निवडणुकीत एक, दोन नाही तर नामसाधर्म्याच्या तब्बल सहा मीनाक्षी पाटील नावाच्या अपक्ष उमेदवार उभ्या करण्यात आल्या होत्या. नामसाधर्म्य असलेले उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळवणे व ते उभे करणे रायगडच्या इतिहासात त्या वेळी पहिल्यांदाच घडले होते आणि याचा परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. शेकापच्या मीनाक्षी पाटील यांना ५९ हजार ९६१ मते मिळाली. ५ हजार ८६७ एवढ्या मतांनी मीनाक्षी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मीनाक्षी पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सर्व नामसाधर्म्याच्या सहा मीनाक्षी पाटील यांना ४ हजार ८९७ मते मिळाली.
नामसाधर्म्याची परंपरा आजही कायम
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ही क्लृप्ती वापरण्यात आली आहे. पनवेल मतदारसंघात बाळाराम पाटील आणि प्रशांत ठाकूर नावाचे प्रत्येकी तीन उमेदवार आहेत. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि शेकापचे बाळाराम पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या नावाशी साधर्म्य असलेला आणखी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. उरण मतदारसंघातून शेकापचे प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. उरणमध्ये मनोहर भोईर हे शिवसेना उबाठा पक्षाचे उरणमधील उमेदवार आहेत. त्यांच्याशिवाय आणखी एक मनोहर भोईर नावाचे उमेदवार रिंगणात आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी नावाचे चार, तर दिलीप भोईर नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार महेंद्र दळवी हे शिवसेनेचे येथे अधिकृत उमेदवार आहेत.