महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. प्रचाराचा धुराळा आता बसणार आहे. या प्रचारात राजकीय नेत्यांच्या शब्दांना फार काही धार दिसली नाही. पण एकमेकांवर शाब्दिक हल्ले करण्याची संधी त्यांनी काही सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी माझ्यावर टीका केली नाही, हा माझ्यासाठी चिंतेचा विषय असल्याची मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे. गेल्यावेळी त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवल्यावर आमच्या जागा वाढल्याची आठवण त्यांनी भाजपाला करून दिली. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार जर आले तर सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर थेट उत्तर देत हा विषयच संपवला.
एका हाताने द्या, दुसर्या हाताने घ्या
लाडकी बहीण योजनेवर त्यांनी टीका केली. ही योजना म्हणजे एका हाताने द्या आणि दुसऱ्या हाताने घ्या अशी आहे. देशात महागाई वाढत आहे. जनता महागाईन त्रस्त आहे. आता कितीही पैसे दिले तरी जनतेला परिवर्तन हवे आहे. निवडणुकीत बदल दिसेल, असे ते म्हणाले. आता महिलांची बाजू घेणाऱ्यांच्या काळात 63 हजार महिलांवर अत्याचार झाल्याची टीका त्यांनी केली. प्रत्येक तासाला या दोन वर्षांत 5 महिलांवर अत्याचार झाल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या अजूनही थांबलेल्या नसल्याचा मुद्दा त्यांनी पुढे केला.
हे सुद्धा वाचा
माझी तर चिंता वाढली
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. हा माझ्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे की, पंतप्रधानांनी यावेळी माझ्यावर टीका केली नाही. टिप्पणी केली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली, त्यावेळी आमच्या जागा वाढल्या. त्यामुळे मी मोदींना राज्यात प्रचाराचं निमंत्रण देतो. त्यांनी महाराष्ट्रात यावं आणि माझ्यावर टिप्पणी करावी. त्यामुळे आमच्या जागा तरी वाढतील, असा टोला त्यांनी लगावला.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील की नाही? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिले. सुप्रिया सुळे यांची पहिली पसंती संसदेला आहे. ती देशातील सर्वात चांगल्या खासदारांपैकी एक आहे. लोकसभेत एखादे बिल अथवा कायद्यावर चर्चा होते, त्यात सुप्रिया सुळे सहभागी होतात. आम्ही अजित पवार यांना विधान परिषदेवरून विधानसभेवर घेतले. एकदा, दोनदा नाही तर चार वेळा त्यांना उपमुख्यमंत्री केले. पक्षाची कमान सुद्धा त्यांच्या हातात दिली. सुप्रिया तर इतक्या वर्षांपासून केवळ खासदार म्हणूनच काम करत आहे. सुळे कधी राज्याच्या राजकारणात सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना मी मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.