Published on
:
20 Nov 2024, 6:01 pm
Updated on
:
20 Nov 2024, 6:01 pm
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी चारंगी लढत होत असल्याने अत्यंत चुरशीने 69 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळपासून कमी दिसत असलेली गर्दी सायंकाळी चार वाजल्यानंतर वाढत गेली. मतदान केंद्रात 6 च्या आत मतदार दाखल झाल्याने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यांचे मतदान रात्री उशिरापर्यंत सुरु होते. 3 लाख 73 हजार 684 मतदारांपैकी 2 लाख 57 हजार 726 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अटीतटीने मतदान पार पडल्याने उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
बुधवार (दि. 20) रोजी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी शांततेत मतदान पार पडले. तत्पुर्वी सध्या थंडी वाढली असल्याने सकाळी 7 वाजता कमी प्रमाणात मतदार मतदान केंद्रांवर दिसून येत होते. पहिले तीन तास मतदान कमी झाले. मात्र, सकाळी 10 नंतर गर्दी वाढू लागली. तर दुपारी 3 वाजता 3 लाख 73 हजार 684 मतदारांपैकी 1 लाख 43 हजार 122 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 38.30 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजले नंतर मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागताना दिसून येत होत्या. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 लाख 2 हजार 446 मतदारांनी मतदान केल्याने 54.18 टक्के मतदान झाले आहे. तर यानंतर मतदान केंद्रावर दाखल झालेल्या मतदारांचे मतदान पार पडण्यासाठी वेळ लागला. अखेरपर्यंत 2 लाख 57 हजार 726 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी 68.97 टक्के आहे.
पंढरपूर विधानसभेसाठी भाजप महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे, मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे व महाविकास आघाडीत बिघाडी होऊन काँग्रेसकडून भगीरथ भालके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत यांच्यात चौरंगी व लक्षवेधी निवडणूक होत आहे. तसेच इतर 20 उमेदवारांचेही मैदानात असल्याचे त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.