Published on
:
20 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
20 Nov 2024, 11:38 pm
मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा निवडणुकीत मंगळवेढ्यातील 30, तर ग्रामीणच्या 159, अशा 189 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. एकूण 24 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदार येऊ लागले होते. थंडी वाढल्याने सकाळच्या सत्रात मतदानाचा टक्का कमी होता. मात्र 11 नंतर मतदानासाठी रांगा लागल्या. मंगळवेढा तालुक्यात संत दामाजीनगर, हुलजंती, भोसे, संत चोखा मेळानगर या चार जिल्हा परिषद गटांत मतदान चुरशीने झाले. शहरात बहुरंगी लढत असल्याने धावपळ दिसून येत होती. शहरातील मतदान केंद्रांवर सेल्फी पॉईंट उभा करण्यात आला. ज्याचा तरुणाईने मोठा लाभ घेतला आणि सोशल मीडियावर व्यक्त होत मतदान करण्याचे आवाहन केले.
मंगळवेढ्यात एक लाख 97 हजार 251 इतके मतदार आहेत. त्यापैकी 95 हजार 331 महिला मतदार, तर एक लाख एक हजार 920 इतके पुरुष मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी मंगळवेढ्यात कार्यरत होते. तत्काळ आरोग्यसेवादेखील सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बर्याच युवकांनी वयोवृद्ध व्यक्तींना मतदान करण्यासाठी घराबाहेर आणून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जात मतदान करण्यास प्रेरित केल्याचे पाहायला मिळाले.
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनिल सावंत, मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे, प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढ्यातील मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रिया सुरळीत पद्धतीने सुरू असल्याचे पाहिले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, बबनराव आवताडे, नंदकुमार पवार, राहुल शहा, शशिकांत चव्हाण, प्रशांत साळे, सिद्धेश्वर आवताडे, चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रथमेश पाटील, अजित जगताप, सुदर्शन यादव, नागेश डोंगरे यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. आ. समाधान आवताडे यांनी कुटुंबासह सकाळी शहरात इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. उमेदवार अनिल सावंत यांनी सपत्नीक लवंगी येथे मतदानाचा अधिकार बजावला.
ग्रामीण भागात दुपारी दोननंतर मतदानाला वेग आला. अनेक महिला मतदारांनी दुपारच्या सत्रात मतदानासाठी जाणे पसंत केले. मतदारसंघातील मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, वीजव्यवस्था आणि दिव्यांगांसाठी आवश्यकतेनुसार रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंगळवेढा तालुक्यातील संवेदनशील असलेल्या गावातील मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मंगळवेढा शहरातील इंग्लिश स्कूलमध्ये आठ बूथ असल्यामुळे याठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त, तर मुढवी येथील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
गोणेवाडी येथे दिव्यांगांसाठी मतदान केंद्र
युथ बूथसाठी लक्ष्मीदहिवडी बूथ 224, जालिहाळ मतदान केंद्र 309, निंबोणी मतदान केंद्र 306, पडोळकरवाडी मतदान केंद्र 356, दिव्यांगांसाठी गोणेवाडी येथील मतदान केंद्र क्रमांक 272, महिलांसाठी मंगळवेढा येथील बूथ क्रमांक 190 व 212 हे बूथ सज्ज ठेवण्यात आले होते.