Published on
:
05 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:50 am
देवगड ः तालुक्यातील शिवसैनिकांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची निवड आपल्या जीवाचे रान करून केली व संपूर्ण तालुक्याबरोबर देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत शिवसेनेची एक अभेद्य ताकद निर्माण केली. असे असताना काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी राजीनामे देऊन अन्य पक्षात प्रवेश करत करत आहेत. त्या सर्व लोकप्रतिनिधीं व पदाधिकार्यांनी शिवसैनिकांचा मान ठेवून आपल्या पदाचा राजीनामा सर्वप्रथम द्यावा व नंतरच पक्षप्रवेश करावा,असे आवाहन ठाकरे युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांनी केले.
देवगड येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विभाग प्रमुख विकास कोयंडे उपस्थित होते.देशपांडे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव पत्करावा लागला.
यामुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांत नाराजी निर्माण झाली व ती नाराजी दूर करून पुन्हा एकदा शिवसेना सक्षम होणे गरजेचे असल्याने नव्याने संघटना बांधणी करून प्रसंगी जनतेचा आवाज सत्ताधार्यापर्यंत पोहोचून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याकरिता शिवसैनिक सज्ज झाले आहेत.
उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी आपल्या प्रकृती स्वास्थामुळे तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समवेत शिवसैनिकांनी निष्ठेने काम करून निश्चितपणे शिवसेना देवगड तालुक्यात रुजवली. साटम हे शांत,संयमी व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडून शिवसैनिकांनी अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासारखे आहेत आणि त्या जोरावर शिवसेनेची संघटनात्मक बांधणी होणे आवश्यक आहे.
आ.नितेश राणे यांनी विजयी हॅट्ट्रिक साधून राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदर विकास मंत्री त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली याबद्दल त्यांचे अभिनंदन आहेच. देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीबरोबरच तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत विशेषतः जनहिताची कामे करण्यासाठी पालकमंत्र्यांसोबत निश्चितपणे यापुढील काळात एकजुटीने उभे राहून या भागातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमची त्यांना साथ असेल.
निव्वळ विरोधाला विरोध न करता जनहिताच्या कामाकरिता आपण एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यास शिवसेना निश्चितपणे ठामपणे विरोध करणार असल्याची माहिती निनाद देशपांडे यांनी दिली.