पवारांच्या राजकीय सारीपाटात माझा बळी:भाजपच्या राम शिंदेंचा अजित पवारांवर आरोप, अजित पवारांच्या रोहित यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

1 hour ago 1
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो. माझा पराभव हा नियोजित कट होता आणि या कटात अजित पवार सहभागी असल्याचा आरोप भाजप नेते राम शिंदे यांनी सोमवारी केला. “अजित पवारांनी रोहित पवारांविरोधात सभा घेतली असती तर काय झालं असतं?’ असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. पराभवानंतर राम शिंदे म्हणाले, त्यांच्या राजकीय सारीपाटात माझा बळी गेला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजप उमेदवार राम शिंदे यांचा १,२४३ मतांनी पराभव केला आहे. रोहित पवारांना १,२७,६७६ मतं मिळाली आहेत, तर राम शिंदे यांना १,२६,४४३ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. शिंदे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक अघोषित करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात करार झाला होता. माझ्याविरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे. मला आज त्याचा प्रत्यय आल्याचे ते म्हणाले. माझ्याविरोधात युगेंद्रला उभे करून काय साध्य केले? माझ्याविरोधात युगेंद्र, धर्माराव आत्राम यांच्याविरोधात मुलीला उभे करून शरद पवार यांनी काय साध्य केले, असा सवालही त्यांनी केला. लाडक्या बहिणींच्या प्रचंड प्रेमाने आमचा विजय झाला. त्यांचा मोठा वाटा आमच्या विजयात आहे. मुख्यमंत्रिपदी कोण असणार, याबाबत आम्ही तिघे लवकरच ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहाण्या, मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं रोहित‌? : अजित पवारांचा टाेला “शहाण्या मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं? थोडक्यात वाचलास, काकाचं दर्शन घे,’ अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केल्याने राज्यात चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यात महविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला विजयी होता आले नाही ही शोकांतिका असल्याचे पवार यांनी सांगितले. कराड येथील प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवारांसह सर्वच मान्यवरांनी चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article