कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणी आज शनिवारी (दि.१८) न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले. (Image soure- X)
Published on
:
18 Jan 2025, 11:59 am
Updated on
:
18 Jan 2025, 11:59 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणी आज शनिवारी (दि.१८) सियालदह न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले. त्याला सोमवारी २० जानेवारी रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. या खटल्याच्या ५७ दिवसांनंतर सियालदह अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी निकाल दिला.
कोलकाता येथील या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात मोठ्या प्रमाणात व्यापक निर्दशने आणि संताप व्यक्त करण्यात आला होता. ९ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या या भयानक घटनेच्या दुसऱ्या दिवशी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक केली. त्यांच्यावर बलात्कार आणि खुनाचा आरोप ठेवण्यात आला.
'तुला शिक्षा झालीच पाहिजे'- न्यायाधीश
"या खटल्यातील मी सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले. युक्तिवादही ऐकले. हे सर्व पाहिल्यावर, मी तुला दोषी ठरवत आहे. तू दोषी आहेस. तुला शिक्षा झालीच पाहिजे," असे न्यायाधीशांनी आरोपीला सुनावले.
...तर आरोपीला फाशीची शिक्षा होऊ शकते
आरोपी रॉयवर कलम ६४ (बलात्कार), कलम ६६ (मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिक्षा) आणि कलम १०३ (खून) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. कलम ६४ अंतर्गत जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षेची तरतूद आहे, तर कलम ६६ अंतर्गत फाशीची शिक्षा होऊ शकते.
पीडितेच्या वडिलाना न्यायालयात रडू कोसळले
दरम्यान, आज निकालादरम्यान पीडितेच्या वडिलांना न्यायालयात अश्रू अनावर झाले. जेव्हा न्यायाधीश अनिर्बान दास यांनी निकाल सुनावला; तेव्हा पीडितेच्या वडिलांनी त्यांना सांगितले, "मला तुमच्यावर पूर्ण विश्वास होता. धन्यवाद, जो तुमच्यावर आम्ही विश्वास दाखवला, त्याला तुम्ही योग्य न्याय दिला," असे ते म्हणाले.
यात एका IPS अधिकाऱ्याचाही समावेश, आरोपी कोर्टात काय म्हणाला?
दरम्यान, नराधम संजय रॉयने न्यायाधीशांसमोर आपण गुन्हा केला नसल्याचा दावा केला. आरोपी संजय रॉयने न्यायाधीशांसमोर म्हटले की, "मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. मी असा गुन्हा केलेला नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सोडून दिले जात आहे. एका आयपीएसचा यात सहभाग आहे."
"मी नेहमी गळ्यात रुद्राक्षाची माळ घालतो. जर मी गुन्हा केला असता तर माझी माळ जेथे घटना घडली तिथेच तुटली असती. मी गुन्हा केलेला नाही. मला यात अडकवण्यात आले. ज्यांनी मला अडकवले त्यात एका IPS अधिकाऱ्याचाही समावेश आहे. पण त्यांना सोडले जात आहे. का?" असा दावा आरोप रॉयने केला. त्यावर न्यायाधीशांनी, त्याचे म्हणणे सोमवारी ऐकून घेतले जाईल, असे सांगत आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेवरुन देशभर डॉक्टरांनी निर्देशने करुन संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.