पुण्यात आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव:तीन लाख रुपयांचे जपानी फाउंटन पेन ते महापुरुषांच्या स्वाक्षरीची पेन्स प्रदर्शनात
6 hours ago
1
पुण्यात सुरू झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवात अनोख्या आणि दुर्मिळ पेन्सचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे. रायटिंग वंडर्स आणि वीनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने १८ आणि १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवातील सर्वात आकर्षक वस्तू म्हणजे पेलिकन कंपनीचे एम-१००० रेड इन ब्लॅक इन्फिनिटी हे तीन लाख रुपयांचे फाउंटन पेन. जपानी कलाकारांनी रुशी आर्टचा वापर करून हे पेन तयार केले असून, त्याचे निब १८ कॅरेट सोन्याचे आहे. या एका पेनची निर्मिती करण्यासाठी चार महिने लागतात. प्रदर्शनात टोलेडो आर्टने सजवलेले सव्वा दोन लाख रुपयांचे सोने-चांदी प्लेटिंग असलेले पेन, तसेच सुवशन आर्टने साकारलेले दोन लाख १५ हजार रुपयांचे मर्यादित आवृत्तीचे पेन (जगभरात फक्त ८८८ नग) देखील आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. शंभर वर्षांहून अधिक जुन्या वोल्ड्मन कंपनीचे सव्वा लाख रुपयांचे संपूर्ण चांदीचे व सोन्याच्या निबचे पेन, तसेच एक लाख ४१ हजार रुपयांचे रोमन डिझाइनचे ग्लॅडिएटर पेन विशेष लक्ष वेधून घेत आहे. महोत्सवात स्वामी दयानंद सरस्वती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरी असलेली विशेष पेन्सही प्रदर्शित करण्यात आली आहेत. अक्षर चांगले ठेवण्यासाठी फाउंटन पेन चांगले काम करते, आपल्याकडे ५०० पेक्षा अधिक पेन्सचा संग्रह असल्याचे फत्तेचंद रांका यावेळी म्हणाले. आयुष्य उज्वल करण्यासाठी पेन महत्वाचे काम करते. त्यामुळे बॉलपेनपेक्षा फाउंटन पेन हे उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले. सध्याचे युग हे ऑनलाईन युग असून त्यादृष्टीने व्यवसाय करण्याची तयारी हवी व नव्या संकल्पना राबवयाला हव्यात, असे मत रांका यांनी यावेळी व्यक्त केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)