पोलीस डायरी – अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; वाघाची शेळी झाली!

2 hours ago 1

>> प्रभाकर पवार

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे मुंब (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी 2024 रोजी बोरिवली पश्चिम येथे मॉरिस नोरोन्हा या बलात्कारी आरोपीने गोळ्या घालून हत्या केली. या हत्येचा तपास मुंबई क्राईम बँच करीत होती. परंतु या बँचने तपास नीट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला आहे.

मॉरिस नोरोन्हा याने गोड बोलून अभिषेक यांना आपल्या बोरिवली (पश्चिम) आयसी कॉलनी येथील प्रभू उद्योग भवन कार्यालयात बोलावून फेसबुक लाईव्ह हत्या केली व आपण किती विश्वासघातकी नराधम आहोत हे साऱ्या जगाला दाखवून दिले. त्यानंतर या क्रूरकर्त्याने आपल्या हातातील रिव्हॉल्व्हरमधून स्वतःच्या मस्तकात गोळी झाडून आत्महत्या केली. या हत्येचा तपास जगभरात नावलौकिक मिळविलेल्या मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आला. मुंबईच्या कांदिवली (युनिट क्र. 11) क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी याचा सुरुवातीला प्रामाणिक व निःपक्षपातीपणे तपास सुरू केला. मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा यास अटक केली. मिश्रा याच्याच परवानाधारक रिव्हॉल्हरमधून मॉरिसने अभिषेकला गोळ्या घातल्या होत्या. अमरेंद्र मिश्राला अटक केल्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येत सहभागी असल्याचा संशय असलेल्या व अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य एका संशयिताला क्राईम बॅचचे अधिकारी अटक करण्याच्या तयारी असतानाच ‘वरून’ सूत्रे हलली आणि घोसाळकर यांच्या हत्येचा तपास ठप्प झाला. सत्ताधारी पक्षाचा एक स्थानिक नेता या कटकारस्थानात गुंतला असल्याचे उघड झाल्याने क्राईम ब्रँच बॅकफूटला गेली. मुंबई क्राइम बॅचच्या अधिकाऱ्यांनी ‘हाराकिरी’ पत्करली. बदलीला घाबरून कांदिवली क्राईम ब्रँचने अमरेंद्र मिश्राच्या अटकेनंतर तपास बंद केला वाघाची शेळी झाली. सध्याच्या महायुतीच्या काळात सारे पोलीस दलच शेळी झाले आहे.

अभिषेक घोसाळकर हे बोरिवली पूर्व-पश्चिम विभागात लोकप्रिय होते. त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर (माजी नगरसेविका) यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका विरोधकांनी घेतला होता. मॉरिस नोरोन्हा याला बळ एका सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीनेच दिले होते. त्यानेच मॉरिसला सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे नेले होते. मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली होती. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतरच मॉरिसने अभिषेकला आपले भांडण मिटविण्यासाठी आपल्या कार्यालयात बोलाविले व त्याचा घात केला. परंतु जगात नावलौकिक असलेली क्राईम बेंच मुळापर्यंत पोहोचली नाही. त्यांनी माघार घेतली. तपासात जाणूनबुजून त्रुटी ठेवल्या आणि म्हणे, आम्ही ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय आहोत अरबी समुद्रात बुडवा ते तुमचे ब्रीदवाक्य अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा पूर्वनियोजित कट असतानाही मुंबई क्राईम बॅचच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मुख्य सूत्रधारांना पाठीशी घातले. हे सारे लक्षात आल्यावर तपासात त्रुटी दिसल्यावर उच्च न्यायालयाने अलीकडे मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासावर ताशेरे ओढले आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला असून मुंबई क्राईम ब्रँचसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मुंबई क्राईम बॅचचे इतके अवमूल्यन झालेले कधी कुणी पाहिले नव्हते. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी मुंबई क्राईम बॅचचे अधिकारी गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत (भूज) पोहोचतात. मुख्यमंत्री ज्याला खरचटलेही नव्हते त्या सलमानच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन करतात. त्याच्यासोबत तासभर गप्पा मारतात. परंतु अभिषेक घोसाळकर विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या संशयितांना सत्ताधारी पाठीशी घालतात याला हुकूमशाही, दडपशाही म्हणतात. सत्ताधाऱ्यांच्या या मनमानीला आज सारी नोकरशाही कंटाळली आहे. अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. काही राजीनामा देत आहेत. गेल्याच आठवड्यात मुंबईचे उपायुक्त निमित गोयल या आयपीएस अधिकाऱ्याने राजीनामा दिला. बिहार कॅडरचे अत्यंत डॅशिंग मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनीही गेल्या आठवड्यात आयपीएस सेवेला रामराम ठोकला आहे.

पूर्वी आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांकडे आदराने पाहिले जायचे. मंत्रीही त्यांना गैरकामे सांगायला घाबरायचेः परंतु सध्याच्या केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांचा पूर्वीचा रुबाब, मानसन्मान धुळीला मिळविला आहे. त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून बरी-वाईट कामे करून घेता येतील तेवढी करून घेतली जात आहेत. त्यांना हवे तसे वाकविले जात आहे. अगदी उघडपणे हे सारे आपल्या देशात सुरू आहे.

बदलापूर बलात्कार प्रकरणातील डायरीतही पोलिसांनी लपवालपवी करण्याचा प्रयत्न केला. आता तर अक्षय शिंदे या बलात्कारी आरोपीला पोलीस चकमकीत ठार मारून राज्यकर्त्यांनी फरार असलेल्या शाळेच्या व्यवस्थापकांविरुद्धचे पुरावेच नष्ट केले आहेत. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातही तेच केले. मुद्दाम त्रुटी ठेवून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला. बदलापूर व घोसाळकर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांना झापले. तेव्हा प्रश्न पडतो हे पोलीस आहेत की शेळ्या आहेत? पोलीस म्हणजे वाघ त्याला बघितल्यावर मी मी म्हणणाऱ्यांची घाबरगुंडी उडते. परंतु सत्ताधाऱ्यांनी पोलीस दादाची वाघाची आता शेळी करून टाकली आहे. भाजपचा एक आमदार तर पोलिसांना रोज आव्हान देतो. काय उपटायची ती उपटा म्हणतो. ही दबंगशाही नव्हे तर काय? नराधम अक्षय शिंदेला चकमकीत ठार मारला हे ठीकच झाले, परंतु ही चकमक चौकशीत खोटी सिद्ध झाली तर उद्या ‘चकमक’ फेम अधिकारी लखनभैया केसप्रमाणे जेलमध्ये जातील. सत्ताधाऱ्यांचे काय नुकसान होणार आहे? म्हणजे सरकारच दबंगशाही करणार असेल, तर उद्या या देशात न्यायाचे राज्य राहणार नाही.

[email protected]

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article