प्रचारतोफा थंडावण्यापर्यंत देशात १ हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्तPudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 1:49 pm
Updated on
:
18 Nov 2024, 1:49 pm
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारंखड विधानसभा निवडणूकीसाठीच्या प्रचारतोफा सोमवारी थंडावल्या असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचारतोफा थंडावण्यापर्यंत महाराष्ट्रात ६६० कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिकची मालमत्ता जप्त केल्याची माहिती सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. तसेच झारखंडमध्ये १९८ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. देशात या दोन राज्यांबरोबर विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका पार पडत आहेत. या पोटनिवडणुकांमध्ये आतापर्यंत २२३ कोटी ९१ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्याती आली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. देशभरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १ हजार ८२ कोटी २ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंडमधील विधानसभा आणि विविध राज्यांतील पोटनिवडणूका जाहीर करतानाच कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार कारवाई करण्यात येत असून ही मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती आयोगाने दिली. महाराष्ट्रात जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये १५३ कोटी ४८ लाख रुपये रोकड, ७१ कोटी १३ लाख रुपयांची दारु, ७२ कोटी १४ लाख रुपयांचे अंमली पदार्थ, २८२ कोटी ४९ लाख रुपयांचे सोने-चांदी, ८० कोटी ९४ लाख रुपयांच्या वस्तूंचा समावेश आहे.
२०१९ च्या तुलनेत ७ पटीने वाढ
दोन्ही राज्यामध्ये मिळून एकूण ८५८ कोटी रुपयांच्या जप्तीची नोंद झाली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेत झालेल्या जप्तीमध्ये २०१९ च्या तुलनेत सात पट वाढ झाली असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यांतील हालचालींचा नियमित पाठपुरावा, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, अंमलबजावणी संस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे आता जप्तीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. दोन राज्यांमधील ११० विधानसभा मतदारसंघांवर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष आहे. या मतदारसंघांना खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून आयोगाने घोषित केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ९१ आणि झारखंडमधील १९ मतदारसंघांचा समावेश आहे.