प्रचाराचा धुरळा थांबला; आता गनिमी कावा:गुप्त प्रचाराचे २४ तास ठरणार निर्णायक, शेवटच्या दिवशी निघाल्या रॅली‎

3 days ago 1
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये उमेदवारांद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ही अंतिम संधी असल्याने प्रस्थापित उमेदवारांसह बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवारही शक्तिप्रदर्शनात आघाडीवर राहिले. प्रत्येकाच्या प्रचाराची पद्धत वेगळी होती. कोणी दुचाकी रॅली काढली, तर कोणी पायदळ फेऱ्या काढल्या. कोणी निवडणूक चिन्हांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मोठ्या कटआऊटद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रचार तोफा म्यान झाल्या आता गनिमी कावा, गुप्त व मूक प्रचाराचे अंतिम २४ तास शह-काटशह देणारे ठरणार आहेत. त्यामुळेच मतदानाच्या आधीची रात्र महत्त्वपूर्ण ठरणारी असते. सायंकाळी प्रचाराचे काम थांबल्यानंतर उमेदवार, कार्यकर्ते काही वेळ सुस्तावले. त्यानंतर त्यांनी राखीव कोट्यातील आयुधे काढून छुप्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पुढील २४ तास हे सर्वच उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचाराच्या १३ दिवसांत जेवढे परिश्रम घेतले नसतील. त्याच्या कितीतरी पटीने जास्त परिश्रम केवळ २४ तासांत घ्यावे लागणार आहे. कारण, मतदारसंघात केवळ शहरी भागच नव्हे तर ग्रामीण भागाचाही समावेश आहे. दोन्ही ठिकाणच्या मतदारांची अपेक्षा, विकासाबाबत मत व एकूणच परिस्थिती ही वेगळी असल्यामुळे उमेदवार, कार्यकर्त्यांना दोन्ही आघाड्यांवर समप्रमाणात लक्ष घालून मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराने काही आयुधं ही राखीव कोट्यात ठेवली होती. ती आता मोकळी केली जाणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या आधीचा मंगळवार, १९ नोव्हेंबर कोणासाठी मंगलदायक ठरणार ते तर मतमोजणीच्या दिवशीच कळेल. परंतु, त्याआधी हा मंगळवार सर्वार्थाने मंगलमय करण्यासाठी उमेदवारांना युद्धस्तरावर काम करावे लागणार आहे. उमेदवारांकडून या २४ तासांत छुप्या गृहभेटी, मतदारांची विचारपूस, सामाजिक माध्यमे, प्रसार माध्यमांमधून जाहिरातींद्वारे प्रचार, फोन कॉलद्वारे आशीर्वाद मागून स्वत:ची माहिती देणे, नाराज मतदारांची मनधरणी करणे, अशी कामे जोरात होणार आहेत. उमेदवारांचे कटआउट, बॅनर काढले, भोंगे उतरले ऑटोंसह इतर प्रचार वाहनांवरील भोंगे आता खाली उतरले असून, उमेदवारांचे मोठे होर्डिंग, कटआऊट, बॅनरही काढण्यात आले आहेत. उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर लागलेले मोठमोठे फलक काढण्याचे काम निवडणूक विभागाद्वारे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित २४ तासांत प्रत्येक मतदार आपापल्या पद्धतीने गुप्तपणे प्रचार करणार आहे. किमान जो भाग प्रत्येक उमेदवारासाठी महत्वाचा आहे, हा भाग तरी ते पिंजून काढतील, यात दुमत नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article