फडणवीस कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मोठी कारवाई:कर्तव्यात बेजबाबदारपणा केल्याने पोलिसाचे निलंबन

2 hours ago 1
मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात एका महिलेने तोडफोड केली होती. ही महिला विनापास फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे या घटनेनंतर मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याप्रकरणी प्रवेशद्वारावर तैनात पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दादरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात गुरुवारी तोडफोड केली होती. मात्र शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. सदरील महिला विनापास फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. विरोधकांनीही सरकारवर निशाण साधला होता. याप्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. सचिव प्रवेशद्वारावर तैनात पोलिसाने महिलेला अडवले नाही अथवा तिची चौकशी केली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिस हवालदार अनिल धनंजय आवळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त आणि बेजबाबदारीचा ठपका ठेवून अनिल आवळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. नेमके काय होते प्रकरण? मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक महिला घुसली आणि तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. यानंतर महिलेने कार्यालयाबाहेरील झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या. तसेच फडणवीसांच्या दालनाबाहेर असलेली त्यांच्या नावाची पाटी देखील काढून फेकली होती. शुक्रवारी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतला असता ही महिला दादर येथील रहिवासी असल्याने समोर आले. धनश्री सहस्त्रबुद्धे असे या महिलेचे नाव आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सदर महिलेचे काय म्हणणे होते, तिने असे का केले ते आम्ही समजून घेऊ. तिने एखाद्या उद्विग्नतेने असे केले का‌‌? त्या महिलेचे व्यथा काय आहे? हे निश्चितपणे समजून घेऊ आणि ती व्यथा दूर करण्यासाठी प्रयत्न करू. या महिलेला कुणी पाठवले होते का, याचीही माहिती घेणार आहोत, असे म्हणाले. हेही वाचा... मंत्रालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली:पोलिसांचा भाजपची कार्यकर्ती असल्याचा दावा; मनोरुग्ण असल्याचा संशय उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला सत्ताधारी भाजपचीच कार्यकर्ती आहे. तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही महिला मनोरुग्ण असल्याचा दावाही केला जात आहे.सविस्तर बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article