Published on
:
29 Nov 2024, 1:37 am
Updated on
:
29 Nov 2024, 1:37 am
फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेगटाचे दीपक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार गटाचे आ. सचिन पाटील यांच्यात झालेल्या लढतीत आ. सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा पराभव करून फलटण तालुक्यातून 17 हजार 46 चे मताधिक्य मिळवले. या निवडणुकीत शहरासह तालुक्यात सचिन पाटील यांचा डंका वाजला असून 80 गावांत घड्याळाला, तर 46 गावांत तुतारीला आघाडी मिळाली आहे. या निकालाने माजी खासदार गटाला नवसंजीवनी मिळाली, तर राजे गटाच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.
फलटण तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटात व 14 गणांपैकी 13 गणात, फलटण शहरातील 47 मतदान केंद्रापैकी 35 मतदान केंद्रावर आ. सचिन पाटील यांनी आघाडी घेतली. तर हिंगणगाव गण व शहरातील 12 मतदान केंद्रावरच दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली. राजे गटाचा बालेकिल्ला असलेल्या कोळकी जिल्हा परिषद गटात आ. सचिन पाटील 361 चे मताधिक्क्य घेतले. या गटात दीपक चव्हाण यांना 10,798 तर सचिन पाटील यांना 11,159 मते मिळाली. कोळकी या गावामध्ये संजीवराजे ना. निंबाळकर यांचे स्वत:चे मतदान आहे. याच गावाने आ. सचिन पाटील यांना 259 चे मताधिक्क्य दिले आहे. रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयकुमार शिंदे यांनी केलेला संघर्ष येथे कामी आला.
जिजामाला ना. निंबाळकर यांच्या गिरवी जि. प. गटात आ. सचिन पाटील यांना 1722 चे मताधिक्य मिळाले. त्यांना 13,111, तर दीपक चव्हाण यांना 11,389 मते मिळाली. गिरवी येथे दिगंबर आगवणे यांना 1324, सचिन पाटील 846, दीपक चव्हाण 1088 मते मिळाली. या गावात आगवणे यांना एक नंबरची मते मिळाली. गुणवरे जि.प. गट शिवरुपराजे खर्डेकर यांनी अतिशय प्रतिष्ठेचा केला होता. या गटात आ. सचिन पाटील यांना तालुक्यात सर्वाधिक 3,336 चे मताधिक्क्य मिळाले. दीपक चव्हाण यांच्या तरडगावात त्यांना 532 चे मताधिक्क्य मिळाले. मात्र तरडगाव जि. प. गटातही ते पिछाडीवर राहिले. या गटात आ. सचिन पाटील यांनी 1300 चे मताधिक्क्य घेतले. प्रल्हाद साळुंखे पाटील व विक्रम भोसले यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या साखरवाडी गटात सचिन पाटील यांना 3321 मताचे लीड मिळाले.
विडणी जि.प. गटात अपेक्षेप्रमाणे आ. सचिन पाटील यांना 3034 एवढे मताधिक्क्य मिळाले. विडणीत मातब्बर विरोधक असतानाही सरपंच सागर अभंग यांनी एकट्याने खिंड लढवून आ. सचिन पाटील यांना 328 चे मताधिक्क्य दिले. हिंगणगाव गटात आ. सचिन पाटील यांनाच 668 चे मताधिक्क्य मिळाले. हिंगणगाव गणामध्ये मात्र आ. पाटील 429 मतांनी मागे राहिले. या गणातच दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली. या गटात आ. पाटील यांना 12,449 तर दीपक चव्हाण यांना 11,781 मते मिळाली.