मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. File Photo
Published on
:
23 Sep 2024, 3:58 pm
Updated on
:
23 Sep 2024, 3:58 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : बदलापूर दोन चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली. या झटापटीत पोलिसांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्याचा एन्काउंटर केला. याप्रकरणी विरोधकांनी हा एन्काउंटर स्क्रिप्टेट आहे, असा आरोप सरकारवर केला असून चिमुकल्यांवर अत्याचार झाला त्यावेळी आरोपीला फाशी द्या, असे म्हणणारे आता आरोपीची बाजू घेत आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे सांगत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला अक्षय शिंदेला तपासासाठी बदलापूरला नेण्यात येत होते. त्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. याप्रकरणी त्याला तपासासाठी तळोजा कारागृहातून बदलापूरला चौकशीसाठी नेले जात होते. यादरम्यान त्याने पोलिसांकडील बंदुक हिसकावून पोलिसांवर फायरिंग केली. यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत अन्य पोलिसही जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच अक्षय शिंदे याने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. चिमुकल्यांवर अत्याचार झाला त्यावेळी आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करणारे आता आरोपीची बाजू घेत आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे असे म्हणत पोलिसांनी स्वत : च्या बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली, असेही ते म्हणाले.