उजनी जलाशयावर रोहित पक्षी pudhari
Published on
:
17 Nov 2024, 9:46 am
Updated on
:
17 Nov 2024, 9:46 am
उजनी धरणाचे (यशवंत सागर) खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचे नुकतेच येथे आगमन झाले आहे. याबाबतची नोंद पक्षिअभ्यासकांनी केली आहे. सुमारे ५० हून अधिक संख्येने आलेले फ्लेमिंगो पक्षी धरण परिसरातील पळसदेव येथील शिंदेवस्ती, काळेवाडी आदी शिवारातील पाणीफुगवठ्यावर येऊन दाखल झाल्याची माहिती स्थानिक पक्षिमित्रांनी दिली आहे. फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे पक्षिअभ्यासक व उजनी जलाशयावर भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे.
या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात धरणाच्या लाभक्षेत्रात विपुल प्रमाणात पाऊस पडल्यामुळे धरण काठोकाठ भरले. स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याखाली गेल्यामुळे प्रवासाचे वेळापत्रक बदलून पक्षी आपले आगमन लांबणीवर टाकतील, असे वाटत असताना नियोजित वेळापत्रकात बदल करून यंदा लवकरच रोहित पक्षी आल्यामुळे पक्षिअभ्यासक संभ्रमात पडले आहेत. या वर्षी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे हे प्रवासी पक्षी लवकर आल्याचा अंदाज पक्षिअभ्यासक व्यक्त करत आहेत.
उजनीवरील विविध पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी घेण्यासाठी कित्येक वर्षांपासून उजनीच्या पाणलोटक्षेत्रावर फिरत आहे. स्थलांतरित पक्षी नेहमी हवामानाचा अंदाज घेत धरण परिसरात येत असतात. त्यापैकी फ्लेमिंगो हे नेहमी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ठरलेल्या वेळेतच येऊन दाखल होत होते. मात्र, गेल्या दशकापासून वातावरणातील अस्थिरतेमुळे या पक्ष्यांचे नियोजित वेळापत्रक कोलमडून ते कधी लवकर तर कधी उशिरा येतात.
डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक
युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार रोहित पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात. या ठिकाणी नवीन पिढीला जन्म घातल्यानंतर नवजात फ्लेमिंगोंनी खुलले उजनीकाठचे सौंदर्य
पिलांसह भारताच्या प्रवासावर निघतात. भारतात येणारे फ्लेमिंगो दोन प्रकारचे असतात. ते म्हणजे ग्रेटर फ्लेमिंगो व लेसर फ्लेमिंगो. उजनीवर फक्त ग्रेटर फ्लेमिंगो असतात. फार कमी संख्येने व केव्हातरी लेसर फ्लेमिंगो उजनीवर येतात.
शंख शिंपले व गोगलगायी (मृदूकाय प्राणी), खेकडे, मासे, बेडूक व चिखलातील विविध कृमी कीटक हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असून, ते पाणवनस्पती व शेवाळावरही ताव मारतात. उजनीच्या पाण्यात आढळणाऱ्या अटोलिया या तांबड्या रंगाचे विशिष्ट शेवाळ फ्लेमिंगोसाठी अतिशय महत्त्वाचे खाद्य ठरते. करड्या रंगाच्या पिढ्यांनी या शेवाळांचे सेवन केल्यामुळे त्यांच्या पंखांना लाल-गुलाबी रंग प्राप्त होतो.