Published on
:
29 Nov 2024, 1:25 am
Updated on
:
29 Nov 2024, 1:25 am
कोल्हापूर : ‘मला खात्री आहे की, शिक्षण प्रसाराच्या कार्याला अलीकडे जे प्रोत्साहन देण्यात येत आहे, ते अल्पकालीन ठरणार नाही. लोकांच्या जुन्या समजुती नाहीशा होतील व विद्येचा प्रकाश सगळीकडे पडत जाईल,’ असे दूरद़ृष्टीचे विचार असणारे कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज (द्वितीय) यांचे वयाच्या 19 व्या वर्षी युरोप अभ्यास दौर्यावर असताना फ्लॉरेन्स (इटली) येथे निधन झाले. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून स्थानिक प्रशासनाने त्यांची समाधी (छत्री) व पुतळ्यासह स्मारक उभारले. आज 150 वर्षांनंतरही कोल्हापूर व फ्लॉरेन्सचे ऋणानुबंध या स्मारकाच्या माध्यमातून जपले आहेत.
अशा या अनोख्या; पण तितक्याच स्फूर्ती व प्रेरणादायी इतिहासाला पुस्तकबद्ध केले आहे कागलच्या घाटगे (सीनिअर) घराण्यातील सूनबाई सौ. नंदिता प्रवीणसिंह घाटगे यांनी. ‘छत्रपती राजराम महाराज : अ महाराजा इन फ्लॉरेन्स’ या 150 पानांच्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन काही महिन्यांपूर्वी इटली येथे झाले. लवकरच इटालियन व मराठीत याचे भाषांतर करण्यात येणार आहे.
इसवी सन 1866 साली राजाराम महाराज वयाच्या 16 व्या वर्षी ‘छत्रपती’ म्हणून अभिषिक्त झाले. सुरुवातीपासूनच हुशार व तल्लख बुद्धीचे व शिक्षणाविषयी प्रचंड जागरूक वृत्तीचे होते. तब्बल 150 वर्षांपूर्वी 15 फेब—ुवारी 1870 रोजी शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षण प्रसाराच्या कार्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी जुना राजवाडा परिसरात मेन राजाराम हायस्कूलच्या इमारतीचा पाया घातला.
स्थानिक प्रशासनाकडून स्मारकाची निर्मिती
कोल्हापूरपासून शेकडो मैल दूर इटलीमधील फ्लॉरेन्सच्या अर्ना नदी व मुगनोने प्रवाह यांच्या संगमावरील ‘केसीन पार्क’ येथे करवीरचे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सन 1874 मध्ये स्थानिक प्रशासनाने छत्रपतींच्या अर्धपुतळ्यासह समाधी स्मारक (छत्री) उभारले. पुतळ्याच्या चारही बाजूंवर रोमन, इंग्रजी, मराठी व पंजाबी या भाषांमध्ये महाराजांबद्दल माहिती कोरली आहे. स्मारकासाठी कोल्हापूरचे तत्कालीन रिजेंड जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे यांनी विशेष योगदान दिले होते. स्मारकासभोवतीच्या तब्बल 160 हेक्टर जागेत उद्यान विकसित केले असून, याला ‘इंडियाना मॉन्युमेंट’ असे नाव दिले आहे. शेजारून वाहणार्या नदीवर अलीकडे बांधण्यात आलेल्या पुलाचे नामकरणही ‘इंडियाना ब्रिज ऑफ प्रिन्स राजाराम महाराज’ असे करण्यात आले. स्मारकाची देखभाल-दुरुस्तीही स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी केली जाते. 750 हजार युरो खर्चून स्मारकाचे जतन-संवर्धन आणि नूतनीकरणही करण्यात आले. जागतिक इतिहासातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व असणार्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून छत्रपती राजाराम महाराज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून ही सेवा दिली जात असल्याची माहिती सौ. नंदिता घाटगे यांनी दिली.
न्यू पॅलेसमधील राजर्षींच्या पेंटिंगमधून प्रेरणा
सौ. नंदिता घाटगे यांना लहानपणापासूनच इतिहास व ऐतिहासिक स्थापत्याची आवड असल्याने त्यांनी सुमारे पाच वर्षे अभ्यास व संशोधन करून ‘घाटगेज : द राईज ऑफ अ रॉयल डायनेस्टी’ या इसवी सन 1398 ते 2022 या कालखंडाच्या इतिहासाचा मागोवा घेणार्या 400 पानांच्या दोन खंडांची निर्मिती नुकतीच केली. इसवी सन 1902 मध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी आजोबा छ. राजाराम महाराज यांच्या फ्लॉरेन्स येथील स्मारकाला भेट दिली होती. या भेटीचे दुर्मीळ चित्र सौ. नंदिता घाटगे यांना न्यू पॅलेस येथे पाहायला मिळाले. त्यातून त्यांना या विषयाच्या अभ्यासाची प्रेरणा मिळाली. इसवी सन 1872 मध्ये प्रकाशित झालेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या डायरीतील माहितीच्या आधारे 2018 मध्ये इटलीतील स्थानिक पत्रकार व अॅड. डिएड्री पेरो यांच्या मदतीने तेथील पुराभिलेखागारातून माहिती संकलन केली. इटालियन भाषेतून याचे भाषांतरही केले. या माहितीच्या आधारे इटालियन भाषेतील पुस्तकनिर्मितीचा निर्णय झाला होता. मात्र, सहकारी अभ्यासक डिएड्री आजारी पडल्याने इंग्रजीतील पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर इंटरनॅशनल स्कूल ऑफ फ्लॉरेन्समध्ये सौ. नंदिता घाटगे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यासह एकूणच मराठा सम—ाज्याच्या इतिहासाचा मागोवा घेतला. त्यांच्या या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाची दखल इटलीतील स्थानिक माध्यमांनी आवर्जून घेतली.