Published on
:
03 Feb 2025, 12:58 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:58 am
सातारा : राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव वाढू लागला आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाली नसली तरी जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. त्यासाठी 46 शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील लातूर, रायगड व ठाणे या तीन जिल्ह्यात पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागासह पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयही सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील एकाही पक्ष्याला बर्ड फ्ल्यूची बाधा झालेली नाही. मात्र दक्षता म्हणून नागरिकांनी अंडी चांगल्या प्रकारे उकडून व चिकन शिजवून खावे. जिल्ह्यातील पोल्ट्री फॉर्म धारकांनी पशुसंवर्धन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
बर्ड फ्ल्यूबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत. पोल्ट्री फॉर्म धारक व व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी. कोंबड्यांमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात अचानक कुक्कुट किंवा इतर पक्ष्यांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात मरतूक आढळून येईल त्या ठिकाणी पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी तपासणी करत आहेत. मागील काही दिवसात अनेक पक्ष्यांची तपासणी केली आहे. तसेच नागरिकांनी देखील बर्ड फ्ल्यूबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू आजाराचे कुक्कुट पक्षी आढळून आलेले नाहीत. मात्र पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी 46 शीघ्र कृतीदलांची स्थापना करण्यात आली आहे. कोंबड्यांना काही लक्षणे दिसल्यास शेतकर्यांनी तसेच पोल्ट्री फॉर्म धारकांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
-डॉ. दिनकर बोर्डे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, सातारा