अन्नसुरक्षा अधिकाराअंतर्गत प्रत्येक नागरिकाला रेशनवरील धान्य मिळण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नसल्याने भटके विमुक्त समाजातील बेघर नागरिकांची पंचाईत होते. त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागते. नेमकी हीच बाब हेरून सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रेसी (सीपीडी) या संस्थेने 61 बेघरांना रेशनचा हक्क मिळवून देत त्यांना दिलासा दिला आहे.
तात्पुरते रेशन कार्ड देण्यासंबंधी 28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारावर सीपीडी संस्थेने गोराई, कांदिवली, गोरेगाव या रेशनिंग कार्यालयामध्ये 75 अर्ज सादर केले होते. यापैकी 61 भटके विमुक्त समाजातील बेघर कुटुंबांना आज गोरेगाव रेशनिंग कार्यालयात 27 ग गोरेगाव शिधावाटप अधिकारी सचिन केदार यांच्या हस्ते रेशन कार्ड देण्यात आले. याप्रसंगी जगदीश पाटणकर, सीपीडी संस्था समन्वयक व रेशनिंग कृती समिती, संयोजक गोरख आव्हाड उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये अर्जांचा पाठपुरावा करणारे सीपीडीचे योगेश बोले तसेच अर्जदार व्यक्ती आणि ठिकाणचे निरीक्षण करणारे निरीक्षक नंदकुमार चव्हाण आणि विकास जाधव त्याचबरोबर बोरिवली रेशन अधिकारी संध्या बांबुळकर, शकील मुजावर तसेच कांदिवली रेशन अधिकारी ज्योती पटेल व आंबेकर निरीक्षक यांचेसुद्धा आभार मानण्यात आले.