कल्याण-डोंबिवलीत सध्याची स्थिती पाहता रस्ते खोदकाम, अपूर्ण फुटपाथ, वाहतूक कोंडीने भरलेले चौक अशी झाली आहे.Pudhari News Network
Published on
:
03 Feb 2025, 5:32 am
Updated on
:
03 Feb 2025, 5:32 am
कल्याण-डोंबिवलीत सध्याची स्थिती पाहता रस्ते खोदकाम, अपूर्ण फुटपाथ, वाहतूक कोंडीने भरलेले चौक अशी शून्य नियोजन परिस्थिती असून ही वाहतूक कोेंडी केवळ रस्त्यावरील वाहनांची नव्हे तर संयमाची असल्याचे दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवलीकरांतून नेटच्या माध्यमातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कल्याण-डोंबिवली ही चाकरमान्यांची शहरे आहेत. घरातून जेवणाचा डबा हा बॅगेत किंवा पाठीवरील सॅगेत कोंबून चाकरमानी सकाळी सहा-सात वाजता नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे जातो आणि रात्री 8 नंतर परततो. नवी मुंबई भागात व्यावसायिक कार्यालये आहेत. तळोजा, महापे, रबाळे तसेच तुर्भे, नेरूळ औद्योगिक वसाहतीमुळे नवी मुंबईकडे जाणारा नोकरदारांचा लोंढा वाढत आहे. मात्र या मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेले वाहतुकीचे पर्याय तुटपुंजे आहेत. त्याचाच परिणाम आज प्रचंड वाहतूक कोंडी आणि वाढलेले अपघात या स्वरूपात दिसत असल्याची खंत या मार्गावरून नियमित प्रवास करणारे प्रवासी मंचचे सचिन गवळी यांनी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईला जाण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि समस्या सोडविण्यात शासन-प्रशासन नाकाम ठरल्याचे वाहतूक कोंडी, जीवघेणे प्रदूषण, वेळ आणि वाहनांच्या इंधनाचा होणारा अपव्यय यातून दिसून येते. कल्याण-वाशी थेट रेल्वेचे स्वप्न दाखवून मते घेऊन निवडून येऊनही नंतर याचा पाठपुरावा योग्य प्रकारे न केल्याने आज ठाणे येथे जाऊन नंतर लोकल बदलून वाशी किंवा पनवेलला जावे लागते. त्यामुळे कल्याण-डोंबिवली-ठाणे या रेल्वे मार्गावर प्रवाश्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी मात्र जीवावर उदार होऊन या मार्गावर प्रवास करत असल्याची टीका प्रवासी मंचचे सचिन गवळी यांनी व्यक्त केली. प्रवाश्यांचा वाहतुकीचा प्रश्न कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई थेट मेट्रो सेवा देऊन सोडविता आला असता. मात्र सदर प्रकल्प नवी मुंबईला थेट नेण्याऐवजी तळोजा मार्गे वळविला आहे. या प्रकल्पाचे काम चालू असल्याने सद्या कल्याण-वाशी मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.