प्रातिनिधिक छायाचित्र. File pHOTO
Published on
:
03 Feb 2025, 5:52 am
Updated on
:
03 Feb 2025, 5:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातील उत्पादनांवर २५ टक्के कर लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॅनेडियन सरकारनेही प्रत्युत्तर दिले आहे. मेरिकेच्या काेणत्या उत्पादनांवर शुल्क आकारण्यात येणार, याची यादीच कॅनडाचे अर्थमंत्री डोमिनिक लेब्लँक यांनी जाहीर केली आहे. (Tariffs War) कॅनडा अमेरिकेतून येणाऱ्या सुमारे $30 अब्ज किमतीच्या उत्पादनांवर कर लादणार आहे. या उत्पादनांच्या यादीमध्ये अमेरिकेत बनवलेले दारू, घरगुती वस्तू, अवजारे, शस्त्रे, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, कपडे आदींचा समावेश आहे.
Tariffs War : आम्ही ही लढाई हरणार नाही : क्रिस्टिया फ्रीलँड
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारताचा डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या उत्पादनांवर २५ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. तसेच चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के कर लावण्याचीही घोषणा केली हाेती. कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अमेरिकेच्या निर्णयाला विरोध केला आहे. आम्हाला याविरुद्ध लढायचे नाही; पण आम्ही ते गमावणारही नाही. याचा अमेरिकन लोकांना खूप त्रास होईल कारण ते अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी कॅनडावर अवलंबून असल्याचे फ्रीलँड यांनी म्हटल्याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी शनिवारी रात्री एका पत्रकार परिषदेत घोषणा केली की, कॅनडा १५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर" २५ टक्के कर लादून प्रत्युत्तर देईल.
ट्रम्प यांनी केली कॅनडा-मेक्सिको, चीनमधील उत्पादनांच्या शुल्कात वाढ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादण्याच्या निर्णयावर म्हटले होते की, यामुळे लोकांना निश्चितच काही समस्या निर्माण होतील; परंतु आपल्याला हा त्रास सहन करावा लागेल. या निर्णयाचा अमेरिकेला फायदा होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शनिवारी म्हटले होते की, अमेरिकेने कॅनेडियन उत्पादनांवर शुल्क लादले तर कॅनडा देखील अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लादून प्रत्युत्तर देईल. अमेरिकेने शुल्क लादण्याची घोषणा करताच, कॅनडाच्या सरकारनेही अनेक अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लादून सडेतोड उत्तर दिले आहे.
चीनने घेतली जागतिक व्यापार संघटनेकडे धाव
चीननेही ट्रम्प सरकारच्या त्यांच्या उत्पादनांवर कर लादण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. मेरिकन सरकारच्या निर्णयाविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत अपील करणार असल्याचे म्हटले आहे. मेक्सिकन सरकारनेही अमेरिकन उत्पादनांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची घोषणा केली आहे.
मेक्सिकोही अमेरिकेवर प्रत्युत्तरात्मक कर लादणार
मेक्सिकन सरकारचे गुन्हेगारी संघटनांशी संबंध आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी केली हाेती. या टीकेला मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम पारडो यांनी सडेताेड उत्तर दिले आहे. कर संदर्भात दोन्ही देशांमधील एक कार्यगट तयार करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.