मराठीसाठी एकत्र आल्यास माणूस, भाषेला धक्का लागणार नाही; राज ठाकरे यांचे प्रतिपादनPudhari
Published on
:
03 Feb 2025, 5:29 am
Updated on
:
03 Feb 2025, 5:29 am
पुणे: महापुरुषांना आपण जातीपातीत अडकवू नये. जाती-पातीतून महाराष्ट्र बाहेर येणे गरजेचे आहे. अवघा महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र यायला हवा. जसे इतर राज्यातील लोक भाषेसाठी, राज्यासाठी एका व्यासपीठावर येतात.
तसेच, आपणही आपापले मतभेद बाजूला सारून मराठीसाठी एकत्र आलो तर मराठी माणूस आणि भाषेला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (दि.2) ठणकावून सांगितले. जिथे जिथे मराठी जपता येईल तिथे जपा, तेव्हाच जग आपली दखल घेईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसर्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अभिनेते रितेश देशमुख यांना राज ठाकरे यांच्या हस्ते कला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अभिनेते सयाजी शिंदे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख, रामदास फुटाणे, उल्हास पवार आणि राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.रितेश यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ही भाग्यवान माणसे. कारण यांना पुरस्कार मिळतात. आमच्या वाटेला फक्त तिरस्कार येतो.
हा तिरस्कार घेऊनच आम्हाला वाटचाल करावी लागते, अशी मिश्कील टिप्पणी करून राज ठाकरे म्हणाले, आपण आपल्या भाषेवर ठाम राहायला हवे. जग त्यानंतरच तुम्हाला दाद देते. आपल्याकडील मुले- मुली एकमेकांना भेटल्यावर हिंदीत बोलतात, का आणि कशासाठी? राज्यगीत असलेले आपले एकमेव राज्य आहे. माणसाचे, भाषेचे, समाजाचे अस्तित्त्व हे जमिनीवर असते.
आज मराठी माणसाचे म्हणून जे अस्तित्त्व शहराशहरांमध्ये असायला पाहिजे, दिसायला पाहिजे. मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्याची गरज आहे. आगामी चौथे विश्व मराठी संमेलन कुसुमाग्रज यांच्या नाशिकमध्ये करणार आहोत. तसेच, युवा, बाल आणि स्त्री संमेलनही घेणार असल्याची घोषणा सामंत यांनी केली. सयाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
साहित्यिकांनी परखडपणे बोलले पाहिजे
पूर्वीच्या काळात साहित्यिक बोलायचे. राजकीय विषयांवर आपले मत मांडायचे. आज कोणी मत मांडताना दिसत नाहीत. कोणतेही सरकार असु देत साहित्यिकांनी मार्ग दाखवला पाहिजे. साहित्यिकांनी नुसती पुस्तके लिहून चालणार नाही तर त्यांनी मार्गदर्शन केले पाहिजे. साहित्यिक जेव्हा बोलायला लागतील तेव्हा माणसे ऐकायला लागतील, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. मराठीसाठी आम्ही सांगू ते करालच. पण, जे जे आम्ही करू, त्यालाही पाठिंबा द्याल, अशी अपेक्षा आहे. तेव्हा फक्त गुन्हे दाखल करू नका, अशी टिप्पणीही ठाकरे यांनी केली.
मराठी घरात जन्म घ्यायला भाग्य लागते. आपण सगळेच भाग्यवान आहोत. मराठी कुटुंबात जन्म घेतल्यावर पहिला शब्द जो कानावर पडला तो मराठी भाषेचा होता. मराठीमुळेच आपली ओळख आहे. हिंदीमध्ये काम करू लागल्यानंतर ‘तू मराठीमध्ये कधी काम करणार?’, असे वडिलांनी विचारले होते. ‘लई भारी’ या माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाची सुरुवात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने झाली. मी हिंदी चित्रपटात काम करत असलो तरी मराठी चित्रपट करणे मी कधीच सोडले नाही. मराठी माझ्या हृदयामध्ये आहे.
- रितेश देशमुख, अभिनेते.