राज्यातील अनेक जिल्ह्यात बिबट्याचा लोकवस्तीशेजारील वावर चिंता वाढवणारा आहे. विशेषतः अबालवृद्धांवरील हल्ल्यांमुळे शेतवस्तीवरील नागरीक भयग्रस्त आहेत. अनेक जनावरांचा बळी गेला आहे. पण केवळ पिंजरे लावून बिबट्याची वाट पाहण्यात धन्यता मानण्यात येत आहे. तर दुसरीकडे बिबट्या मोठं कांड करून निघून जातो. भाजप नेते सुजय विखे पाटील, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ते आता हायकोर्टाचा पण दरवाजा ठोठावणार आहेत.
बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या
माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे. सततच्या घटना घडत असतानाही राज्य पातळीवर कोणताचा तोडगा न निघाल्याने ते अस्वस्थ झालेत. बिबट्याचे मानव आणि पशुधनावर हल्ले वाढले आहेत. बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा
जनहित याचिका दाखल करणार
भाजपचे माजी खासदार सुजय विखे न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकांचा तसेच नागरीकांचा मृत्यू झाला आहे. बिबट्या माणसांना मारू शकतो, मात्र माणसं बिबट्याला मारू शकत नाही. बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली आहे. बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे विखे म्हणाले.
देर आये दुरूस्त आए
शिर्डीतील दुहेरी हत्याकांड नंतर प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईवर सुजय विखेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जो भक्त दर्शन रांगेत असेल त्यालाच आता कुपन मिळेल, या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. आमचा विरोध साईभक्तांना कधीच नव्हता. पुढील आठवड्यापर्यंत रोज जेवणारे साईभक्त आणि इतर जेवणारे यातील आकडे देखील आता समोर येतील. वेगवेगळ्या कारणांनी शिर्डीत येऊन स्थायिक झालेले आकडे आता समोर येतील, असे सूचक विधान त्यांनी केले. कर्मचार्यांच्या ड्युटी वेळेत केलेला बदल देखील स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात कर्मचार्यांसाठी बस सेवा सुरू केली जावू शकते का यावर विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.