पांगरी मतदान केंद्रावर मतदानासाठी लागलेली रांग. Pudhari Photo
Published on
:
21 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
21 Nov 2024, 12:30 am
बार्शी : संपूर्ण राज्यात हाय व्होल्टेज लढत म्हणून रंगलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता शांततेत 73 टक्के मतदान झाले. 337499 मतदारापैकी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 210860 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर सहा नंतरही मतदानासाठी रांगा कायम होत्या.
बार्शी येथील अभिनव विद्यालय, सिल्व्हर प्रशाला,पंडित जवाहलाल नेहरू प्रशाला येथील केंद्रावर सहा नंतर मतदारांची मोठी गर्दी शिल्लक होती. तसेच तालुक्यातील पांगरी येथील बूथ क्रमांक 46,47 वर सहा नंतरही मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यातील कुसळंब पाथरे शेंद्रे, लमाण तांडा देवगाव नांनी येथेही सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा मतदानासाठी होत्या. तालुक्यातील कारी येथील एका मतदान केंद्रावर व्हीव्ही पॅट मशिन नादुरुस्त झाल्याने तातडीने तेथे शिल्लक असलेली मशिन देण्यात आली.
बार्शी शहर व तालुक्यात सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर रांगोळी काढून मतदाराचे स्वागत करण्यात आले.167 मतदान केंद्रावर बार्शी येथील कंट्रोल रूम मधून गैरप्रकार करणार्या वर लक्ष ठेवले जात होते. कोणी जर मोबाईल अथवा इतर गैरकृत्य करत असल्यास त्याच्यावर कारवाई केली जात होती. सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. मतदारांनी शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येत होते.
सकाळी 7 ते 9 या पहिल्या दोन तासांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, या दोन तासांत एकूण 17,761 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 11,219 पुरुष आणि 6,542 महिलांचा समावेश होता. पहिल्या दोन तासात 5.26 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 337499 मतदारापैकी 210860 मतदारांनी व इतर 15 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पांगरी येथे सहा वाजेपर्यंत 4006 मतदान झाले होते तर पांगरी येथीलच तीन मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत होती.काटेगाव येथे 1848 पैकी 1316 मतदान झाले. कारी येथे 74.98 टक्के मतदान झाले. 4517 मतदरापैकी 3387 मतदान झाले. आगळगाव येथे सहा वाजेपर्यंत 3607 मतदारापैकी 2643 मतदारांनी मतदान केले. घानेगाव येथे रात्री 8 वाजेपर्यंत मतदान सुरू होते. उक्कडगाव येथे ही सहा नंतर मतदारांची गर्दी होती.
केंद्रात मोबाईल नेणार्यांवर होणार कारवाई
बार्शी येथील मतदान केंद्र क्रमांक 84 येथे मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊन गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या इसमाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला जाणार आहे.