महायुतीचा विजय म्हणजे 'ईव्हीएम' घोटाळा असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला. Pudhari News network
Published on
:
25 Nov 2024, 5:43 am
Updated on
:
25 Nov 2024, 5:43 am
नाशिक : मतदार पाठीशी असताना आमचा पराभव होऊच कसा शकतो? नाशिक पश्चिममध्ये भाजपचा नव्हे, तर ईव्हीएम मशीनचा विजय झाला आहे. भाजपसह महायुतीतील पक्षांनी देशातील लोकशाही नेस्तानाबूत करण्यासाठी राज्यात 'ईव्हीएम घोटाळा' केला आहे. याची चौकशी व्हायलाच हवी. याशिवाय आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांना एकत्र यावे, अशी मागणी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेच्या तिकिटावर लढलेल्या दिनकर पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची अवघे ४६ हजार ६४९ मते मिळाली. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी तब्बल ६८ हजार १७७ मतांनी विजय साकारत या मतदारसंघात हॅट्ट्रिक साधली. मात्र, हा विजय भाजपचा नसून, ईव्हीएम मशीनचा असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ते म्हणाले, राज्यात ज्यांचा पराभव अशक्य आहे, अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. प्रचारादरम्यान ती आम्हाला दिसून आली. याशिवाय मतदारसंघातील सर्व गावांनी मनसेला पाठिंबा दिला होता. मतदारसंघातील तरुण, महिला, पुरुष, ज्येष्ठ हे सर्व पाठीशी असताना पराभव होणे ही न पटणारी बाब आहे. महायुतीने ईव्हीएम मशीन घोटाळा करून विजय साध्य केला आहे. या विरोधात राज्यातील सर्व विरोधी नेत्यांनी एकत्र येऊन आवाज उठवावा. तसेच आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, ही मागणी लावून धरायला हवी, असेही दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.