बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. मस्साजोगचं प्रकरण ताजं असतानाच आता एका महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. त्रासाला कंटाळलेल्या या महिला सरपंचाकडून आता आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मस्साजोग येथील सरपंचाची हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे उघडकीस आला आहे. महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलेचं कुटुंब दहशतीच्या सावटाखाली आहे. त्रासाला कंटाळलेल्या या महिला सरपंचाकडून आता थेट आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
मंगलाबाई राम मामडगे असं या महिला सरपंचाच नाव आहे. त्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) गावाच्या सरपंच आहेत. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. या महिलेनं आता या प्रकरणात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू असं मंगलाबाई यांनी म्हटलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक खंडणी प्रकरणाचं कनेक्शन देखील समोर आलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सध्या बीडकडे लागलं आहे. मात्र असं असताना देखील आता आणखी एक महिला सरपंचाने आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. जर न्याय मिळाला नाही तर आपण आत्मदहन करू असा इशारा देखील या प्रकरणात देण्यात आला आहे.