Published on
:
22 Sep 2024, 1:06 pm
Updated on
:
22 Sep 2024, 1:06 pm
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : पुन्हई गावशिवारात रविवारी (दि.22) विजेच्या पोलची वाहतूक करताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने मोठा अपघात झाला. ट्रॉली पलटी झाल्यामुळे त्यामध्ये बसलेल्या दोन दोन मजूरांचा पोलखाली दबून घटनास्थळी मृत्यू झाला. तर तीसरा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. रामदास पुंजाजी बेलोकार (वय.४०) आणि मंगेश ज्ञानदेव सातव (वय.३२, रा. वाडी महाळूंगी ता.नांदूरा) दोन मृतकांची नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील पुन्हई गावशिवारात ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. रामदास आणि मंगेश हे ट्रॅक्टरमधून पोलची वाहतूक करत होते. महावितरण कंपनीच्या वीजपोल उभारणीची कामे घेतलेल्या कंत्राटदाराकडे ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे वीज पोलची वाहतूक करण्याच्या रोजंदारी कामावर हे मजूर होते. हा अपघात कसा झाला या विषयीची अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवली आहेत. यानंतर त्याच्या राहत्या गावी त्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.