केर्ली येथील फरशी कामगार दीपक कांबळे याचा चिकोडीत संशयास्पद मृत्यू झाला.Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 11:49 am
Updated on
:
23 Jan 2025, 11:49 am
चिकोडी; पुढारी वृतसेवा : चिकोडी बस स्थानकात कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली येथील व्यक्तीचा मृतदेह आज (दि.२३) सकाळी आढळून आला आहे. या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक की घातपातामुळे झाला. याविषयी संशय व्यक्त केला जात आहे. दीपक यशवंत कांबळे (वय 42, रा. केर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. (Belgaum News)
याबाबत अधिक माहिती अशी की, फरशी काम करणारे दीपक हे मागील काही दिवसांपासून चिकोडी व निपाणी परिसरात फरशीचे काम करत होते. सोमवारी कोल्हापूरहून चिकोडी परिसरात फरशी बसवण्यासाठी ते आले होते. आज सकाळी चिकोडी बस स्थानकातील एका कट्ट्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर कोल्हापूरची व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिल्यानंतर कुटुंबीय व केर्ली ग्रामपंचायतचे सदस्य दीपक कांबळे, कृष्णा कांबळे इतरांनी चिकोडीला धाव घेतली.
दीपक याचा नैसर्गिक मृत्यू झाला की घातपात झाला. याविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. चिकोडी पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्हीची तपासणी केली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजणार आहे. दीपक याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.