शाहूवाडी वस्तीतील पहिली शिक्षित मुलगी
Published on
:
24 Jan 2025, 1:38 am
Updated on
:
24 Jan 2025, 1:38 am
कोल्हापूर : वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत ती आईसोबत कचर्यातील भंगार गोळा करायला जायची. भंगार गोळा करून तिने शाळेतील धडेही गिरवले. शिक्षणाची आस तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिच्या याच गुणाची पारख उमेद शिक्षण केंद्राने केली. या केंद्रात राहून गिताशा दहावी उत्तीर्ण झाली. वस्तीतील भंगारवेचक कुटुंबातील दहावी पास झालेली ती पहिली मुलगी ठरली. सध्या ती बी.कॉम.च्या दुसर्या वर्षात शिकत आहे. तसेच वस्तीतील भंगारवेचकांच्या ज्या वर्गात ती शिकली त्याच वर्गात आज ती शिक्षिका म्हणूनही काम करत आहे. गिताशा गणेश गोसावी या भंगारवेचक मुलीने शिक्षणाची कास धरत आयुष्याचे सोने केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात तीस ते चाळीस घरांची भंगारवेचकांची वस्ती आहे. या कुटुंबाची आर्थिक गुजराण कचरा आणि भंगावर गोळा करून होते. या भागात 2016 साली उमेद शिक्षण केंद्र सुरू झाले. भंगार वेचणार्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उमेद केंद्राने पुढाकार घेतला. गिताशा चौथीत होती जेव्हा ती या केंद्रात आली. गिताशाचे पालक दिवसभर कचर्यातील भंगार गोळा करायचे. गिताशाने कोणताही खासगी क्लास न लावता दहावी उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. बी.कॉम. पदवीनंतर तिला स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे. भंगार गोळा करताना आर्थिक परिस्थितीच्या वजाबाकीला शिक्षणाने गुणाकारात बदलून गिताशाने आयुष्याचे गणित अचूक सोडवले आहे. ज्या केंद्रात तिला शिकण्याची संधी मिळाली आज त्याच केंद्रातील भंगारवेचकांच्या मुलांना शिकवण्यासाठीही ती सेवा देते. रोज सायंकाळी शाहूवाडी येथील मल्हारपेठ परिसरात सायंकाळी सहा ते आठ यावेळेत ती ज्ञानदानाचे काम करते.
आई-वडिलांसोबत भंगार वेचायला जातानाच मी शिकण्याचेही स्वप्नं पाहिले होते. जर जिद्द असेल तर समाज संधी निर्माण करतो याची मला प्रचिती आली. शिक्षणाच्या हक्कामुळे मी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले याचा आनंद आहे.
गिताशा गोसावी