भंडारा: तुमसरजवळील देव्हाडी येथील क्लेरियन औषध निर्मिती कारखान्यात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका कर्मचाऱ्यावर अमोनिया नामक द्रव्य पडल्याने ते गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीररित्या भाजलेल्या कर्मचाºयाचे नाव सुनील दमाहे(३२) रा. देव्हाडी असे आहे.
देव्हाडी येथे तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर क्लेरियन औषध निर्मिती कारखाना आहे. सुपरवायझर सुनील दमाहे यांची बुधवारी रात्रपाळी होती. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास बॉयलरजवळ सुनील हे कर्तव्य बजावत होते. दरम्यान अचानक ज्वलनशील अमोनिया नामक द्रव्य सुनील यांच्या अंगावर पडले. त्यात ते गंभीररीत्या भाजले. या घटनेने कारखान्यातील कामगारात एकच खळबळ माजली.
क्लेरियन कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी रात्रीच घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी तात्काळ भाजलेले सुपरवायझर सुनील दमाहे यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.क्लेरियन औषध निर्मिती कारखाना मागील ३५ वर्षापासून देव्हाडी शिवारात आहे. येथे सुमारे २५० कामगार व अधिकारी कार्यरत आहेत.