भंडारा:- सध्या जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात रेतीतस्करीत वाढ झाली आहे. नवनवीन शक्कल वापरुन रेती तस्करी केली जात आहे. जवळच्या राजेदहेगाव येथील गोवरी नदीतून बैलगाडीतून रेती तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
काही दिवसापूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने जिल्ह्यातील रेती तस्करीत वापर केल्या जात असलेले ९ ट्रॅक पकडले. यात जवाहरनगर पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातून वाहतूक केले जात असलेले ४ ट्रक पकडून कारवाई केली होती. या कारवाईनंतर जिल्हा पोलिस यंत्रणा झोपेतून लगेच जागे झाली. काही थातूरमातूर केलेल्या कारवाईतून पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. त्यानंतर मात्र रेती तस्करी जैसे थे यावर येथून ठेपली आहे. महसूल विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे.
रेतीतस्करी होवू नये, यासाठी काही रेतीघाटांजवळील मुख्य रस्त्यावर महसूल विभागाने चौक्या उभ्या केल्या. त्यामुळे ट्रॅक्टरने रेतीतस्करीला काही प्रमाणात आळा बसल्याचे चित्र आहे. मात्र,जवाहरनगर परिसरातील राजेदहेगाव येथील बैलगाडीधारकांनी यावर क्लृप्ती काढत नवीन रस्ता बनवून रेतीतस्करी करीत आहेत. नदीपात्रातील रेती काठावर व गावशेजारील असलेल्या शेतात जमा करीत आहेत.
सध्या शेतकरी पिकासोबत बैलबंडीनी रेतीला व्यवसायाचे स्वरुप दिल्याचे दिसून येते. एका बैलगाडीमधील रेती पंधराशे ते दोन हजार रुपयांना ट्रॅक्टर ट्रॉली मालकांना विकली जात आहे. या रेती घाटावर बैलगाड्या पहाटेच्या वेळेपासून ते सायंकाळी सूर्य मावळेपर्यंत दिवसाला अनेक खेपा मारून रेतीचे ढीग तयार करतात.
हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून राजेदहेगाव गोवरी मुख्य रस्त्यालगत मोठमोठी रेतीचे ढिगारे तयार केल्याचे या रस्त्याने प्रवास करणारे नागरिकांच्या नजरेस पडतात. या बाबीकडे महसूल विभाग सहजतेने बघत असले तरी यात परसोडी व गोवरी तलाठी साझ्यातील अधिकाºयांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा गोरखधंदा मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या माध्यमातून नदी किनारी असलेले शेतकरी बैलबंडीच्या माध्यमातून हजारो रुपये कमावित आहेत. स्थानिक महसूल विभागाच्या डोळ्यादेखत बैलबंडीद्वारे रेती नेली जात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.