सराफी पेढीवर दरोडाPudhari
Published on
:
22 Jan 2025, 9:47 am
Updated on
:
22 Jan 2025, 9:47 am
पोहेगाव (ता. कोपरगाव) येथे संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी नंग्या तलवारी घेऊन माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकला. त्यात दुकानदार ज्ञानेश्वर माधवराव माळवे (वय 55) व त्यांचा मुलगा संकेत (मूळ रा. कोळगाव, कोपरगाव) जखमी झाले. दरम्यान, दहशत पसरवत पळून जाणार्या दोन चोरट्यांना पकडून ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन शिर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य दोघे मात्र दुचाकीवरून पळून गेले. या चोरट्यांकडे तलवारींसोबत गावठी कट्टाही होता, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
याबाबत माहिती अशी ः पोहेगाव येथे बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलातील माळवे सराफ या दुकानात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चार चोरटे शिरले. त्यांच्या हातात नग्या तलवारी होत्या, असे सांगण्यात येते. त्यांनी शेजारच्या वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानांवरही दहशत निर्माण केली. सराफ दुकानातून माळवे पिता-पुत्राला त्यांनी मारहाण केली. दागिने लुटून निघून जात असताना माळवे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे दुकानासमोरील लोक धावले. दुचाकीवरून पळून जाणार्या चोरट्यांना काही तरुणांनी पकडले. नंग्या तलवारी काढत या चोरट्यानी दहशत केली. मात्र जमावानी दोघांना पकडले. अन्य दोघे दुसर्या दुचाकीवरून पळून गेले. जमावाने पकडलेल्या दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी नग्न करून बेदम मारहाण केली. त्यामुळे चोरटेही गंभीर जखमी झाले.
शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वनमे, निरीक्षक कुंभार, सहायक निरीक्षक भारत बलय्या, गणेश घुले आदींनी घटनास्थळी येऊन दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले आणि शिर्डीच्या श्रीसाईबाबा रुग्णालयात दाखल केले. त्यांची नावे फराज एजाज सय्यद (वय 35) आणि आदित्य बागूल (वय 34, दोघे रा. कोपरगाव) अशी असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी सराफ व्यावसायिक ज्ञानदेव माळवे यांच्यावरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही फिर्याद दाखल झाली नव्हती.