Published on
:
25 Nov 2024, 3:05 am
Updated on
:
25 Nov 2024, 3:05 am
मुंबई : गौरीशंकर घाळे
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील या अभूतपूर्व यशाची चर्चा दीर्घकाळ होत राहणार असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपची पक्ष संघटना, महायुती सरकारच्या लोकप्रिय योजना म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व या चतु:सूत्रीने भाजपचा महाविजय साकारला, असे जाणकारांना वाटते.
सलग तीन विधानसभा निवडणुकांत भाजपने शंभरहून अधिक जागांवर विजयाची नोंद केली. त्यातही यंदाच्या निवडणुकीत अवघ्या 149 जागा लढवीत तब्बल 133 जागांवर कमळ फुलले. शिवाय, महायुतीच्या राजकारणाची गरज म्हणून ऐनवेळी 16 जागांवर मित्रपक्षांना आपल्याच उमेदवारांचा पुरवठा करत त्यातल्या नऊ जागाही जिंकल्या.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा त्यातही भाजपचा दारुण पराभव होताच भाजपने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या. धार्मिक ध्रुवीकरण आणि संविधान बदलाचे नरेटिव्ह प्रभावी ठरल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवार अस्वस्थ होता. त्यात हक्काच्या मतदारांनी मतदान करण्यात आळस केल्याची एक बोच होती. विधानसभा हाच कित्ता गिरवला जाऊ नये म्हणून संघ परिवार विधानसभेला कंबर कसून उभा राहिला.
दुसरीकडे, भाजपनेही पक्ष संघटनेत आलेले शैथिल्य, नेते-कार्यकर्ते यांच्यातील रुसवा-हेवेदावे, निरुत्साह यावर वेळीच उपाययोजना केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतः महाराष्ट्रातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली. प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे दोन महिने महाराष्ट्रात ठाण मांडून होते. जवळपास रोज सकाळी नऊ ते रात्री उशिरापर्यंत ते प्रदेश कार्यालयात तळ ठोकून असत. पक्षाच्या विविध समित्यांच्या बैठका, त्यातील निर्णयांची अंमलबजावणी आणि सुधारणा यासाठी सुनियोजित यंत्रणा उभारण्यात आली. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला.
यादव यांनी स्वतः महाराष्ट्रातील विविध छोट्यामोठ्या जातसमूहांच्या शंभर शिष्टमंडळांशी संवाद साधला. हे घटक भाजपसोबत राहतील याची काळजी घेतली. भाजपच्या निवडणूक व्यवस्थापनाने सरकारविरोधी भावनेची धार बोथट होईल याची काळजी घेतली. ‘कटेंगे तो बटेंगे’ आणि ‘एक है, तो सेफ’ या घोषणा महाराष्ट्राच्या विचारविश्वात वादाच्या ठरल्या. मात्र, स्थानिक पातळीवर याचा योग्य तो परिणाम साधला जाईल, याची निगुतीने काळजी घेतली गेली. आचारसंहिता लागण्यापूर्वी समाजघटकांच्या 250 बैठका पार पडल्या होत्या, यातच सारे आले.
संघ परिवाराने निवडणूक काळात 60 हजारांवर बैठका घेतल्या. अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विविध जातसमूहांचे मेळावे घेण्यात आले.
समरसता मंच आणि विवेक विचार मंच, हिंदू जागरण मंच, विश्व हिंदू परिषदेने संवाद मेळावे घेतले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाखानिहाय पट रचना संघ यंत्रणेने तयार केली.
विशेष म्हणजे संघ स्वयंसेवकांनी स्वतंत्रपणे ही यंत्रणा राबविली. प्रत्यक्ष भेटीगाठी घेत मतदान वाढविण्यावर भर दिला. मतदानाची वेळ संपेपर्यंत फोनाफोनी, भेटीद्वारे मतदान झाल्याची खातरजमा संघाकडून केली जात होती.
मंत्री भूपेंद्र यादव यांनी साडेबारा हजार बुथवर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती. ते काम प्रवासी कार्यकर्ता, विस्तारक, अनुलोम आणि वराहे पॉलिटिकल कन्सल्टिंग एजन्सीच्या माध्यमातून करण्यात आले.
विवेक विचार मंचाने संविधान जागर यात्रा आणि घर घर संविधान या मोहिमा राबविल्या. संत, कीर्तनकार, अध्यात्मिक प्रवचनकार यांचा समन्वय शिवशंभू विचार मंचाने केला.
मराठा, ओबीसी, एससी-एसटी आणि सिव्हिल सोसायटी असे दहा ते बारा वेगळे गट तयार करण्यात आले होते.
या सर्वच उपक्रमांचा समन्वय सहसरकार्यवाह अतुल लिमये आणि क्षेत्रीय प्रचारक सुमंत आमशेकर यांनी केला. लिमये हे स्वतः तीन महिने महाराष्ट्रात तळ ठोकून होते.
या प्रयत्नातून राज्यभरात किमान 6-7 लाख मतदान वाटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.