Published on
:
15 Nov 2024, 10:11 am
Updated on
:
15 Nov 2024, 10:11 am
डोंबिवली : भाजपाचे कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशांवरून मानपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातून तडीपारची कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील भाजपाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याने राजकिय गोटात एकच खळबळ माजली आहे.
भाजपाचे कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांचे 27 गावांसह भोपर गावठाण परिसरात वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत संदीप माळी हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदासंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचे काम करत असल्याच्या तक्रारी महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे केल्या होत्या. कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे हे महायुतीचे उमेदवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक मानले जातात. मोरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने ग्रामीणमध्ये जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आमदार राजू पाटील यांनी अहोरात्र परिश्रम घेतले होते. मात्र तरीही शिंदे शिवसेनेने राजेश मोरे यांना कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवारी दिल्याने मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर कठोर शब्दांत टीकेची झोड घेतली. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि मनसेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदासंघामध्ये कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे संदीप माळी हे मनसेचे राजू पाटील यांचे काम करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशाच प्रकारे तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीमध्ये महायुतीतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने बंडखोर उमेदवाराचे समर्थन सुरू केल्याची कुणकुण लागताच त्यांनाही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. तथापी नंतर हे प्रकरण थंडावले. मात्र भाजपाचे कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर केलेल्या हद्दपारीच्या कारवाईबद्दल भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशाच प्रकारची कारवाई पोलिसांच्या अभिलेखावरील राजकीय मंडळींवर कारवाई करण्याची मागणी नाराज कार्यकर्ते करत आहेत.
या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. एकीकडे अधिक माहितीसाठी संदीप माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तर दुसरीकडे भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या विषयावर बोलणे टाळले. आता भाजपा या संदर्भात काय निर्णय घेते ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.