Published on
:
02 Feb 2025, 10:50 am
Updated on
:
02 Feb 2025, 10:50 am
गुडाळ : पुढारी वृत्तसेवा
भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत मतदानाची गती संथ असली तरी भोगावती कारखान्याच्या सभासद असलेल्या लाडक्या बहिणींनी मात्र उत्साहाने मतदानासाठी रांग लावल्याचे चित्र गुडाळ ता. राधानगरी येथे दिसून आले.
भोगावती साखर कारखाना प्रणित भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावर तेरा विश्वस्त नेमण्यासाठी निवडणूक लागली आहे. सर्व जागा खुल्या आहेत. या निवडणुकीत कारखान्याचे 28 हजार 956 सभासद मतदार म्हणून पात्र आहेत.
भोगावती कारखान्यात सत्तारूढ असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस, ए वाय पाटील गट, अरुण डोंगळे गट, शेका पक्ष, जनता दल आणि राष्ट्रीय काँग्रेसचा सदाशिवराव चरापले गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना या सर्वांची राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडी विरुद्ध धैर्यशील पाटील कौलवकर गट, भाजपा, शिवसेना चंद्रदीप नरके गट, प्रा. किसनराव चौगले गट यांची स्व. दादासाहेब पाटील कौलवकर शिव शाहू आघाडी अशा दोन आघाड्यात थेट दुरंगी लढत होत आहे. नूतन पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर गटाने आपले सर्व उमेदवारी अर्ज माघार घेऊन या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आबिटकर समर्थक निवडणुकीच्या प्रचारात कोठेही सहभागी झालेले नाहीत.
गेले आठ-दहा दिवस भोगावती कार्यक्षेत्रातील गावा-गावात दोन्ही आघाड्यांनी प्रचाराचे रान उठवले होते. सत्तारूढ गटाकडे इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावली आहे हे सोमवारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.