मतदानाआधीच राजकारणात मोठ्या घडामोडी:राहुल गांधींचा थेट प्रकाश आंबेडकरांना फोन; दोन्ही पक्षामधील कटुता कमी होण्याची चर्चा

6 days ago 2
काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत महाविकास आघाडीची युती झाली नसल्यामुळे काँग्रेस आणि वंचित मध्ये दुरावा वाढला होता. मात्र तरी देखील प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र आता राहुल गांधी यांनीच फोन केल्यामुळे काँग्रेस आणि वंचित मधील कटुता काही प्रमाणात कमी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अँजिओप्लॅस्टी शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रिये नंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. ते राज्यभरातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेत आहेत. यादरम्यान ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रचार सभेसाठी आले असता त्यांना राहुल गांधी यांनी फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची चौकशी करत काळजी घेण्याचे आवाहन देखील केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती. प्रकाश आंबेडकर हे स्वतः काही बैठकींना उपस्थित होते. तरी देखील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतः उमेदवार उभे केले. इतकेच नाही तर काँग्रेसच्या काही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देखील देण्यात आला होता. मात्र तरी देखील अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होता. काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. मात्र आता राहुल गांधी यांचा फोन आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील कटुता कमी होणार का? हे पहावे लागेल. या दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत मात्र अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article