28 कोटी वर्षांपूर्वीच्या इकोसिस्टीममधील पायांचे ठसे, वनस्पतींचे जीवाश्म आढळून आले. Pudhari File Photo
Published on
:
21 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
21 Nov 2024, 11:35 pm
लंडन : कधी कधी अपघातानेच काही शोध लागत असतात. आता इटलीत आल्प्स पर्वतावर हायकिंग करीत असलेल्या एका महिलेलाही अपघातानेच कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या खुणा सापडल्या. तब्बल 28 कोटी वर्षांपूर्वीच्या इकोसिस्टीममधील पायांचे ठसे, वनस्पतींचे जीवाश्म आणि अगदी पावसाच्या थेंबाचे इम्प्रींट्सही आढळून आले.
क्लौडिया स्टीफन्सन ही महिला आपल्या पतीसमवेत हायकिंग करीत असताना हा शोध लागला. ती आपल्या पतीच्या मागून पर्वताची चढण चढत चालली होती. लोम्बार्डे येथील वाल्टेलिना ओरोबी माऊंटन पार्कमध्ये हे दोघे हायकिंग करीत होते. त्यावेळी या महिलेचे पाऊल एका अनोख्या दगडावर पडले. हा दगड सिमेंटची स्लॅब असावा, असा दिसत होता. या दगडाकडे तिने बारकाईने पाहिल्यावर त्यावर काही खुणा आढळून आल्या. हे पायाचे ठसे असल्याचे तिच्या लक्षात आले. 2023 मध्ये ही घटना घडली व तिची माहिती तिने संशोधकांना दिली. त्यांनी याठिकाणी येऊन वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण सुरू केले. त्यावेळी या पावलाच्या खुणा प्रागैतिहासिक काळातील सरीसृपांच्या असल्याचे स्पष्ट झाले. आल्प्स पर्वतावरील या ‘रॉक झिरो’जवळ आणखी काय आहे, याचाही शोध सुरू झाला. त्यासाठी वैज्ञानिकांचे पथक अनेक वेळा तिथे गेले. त्यावेळी एका संपूर्ण इकोसिस्टीमचा शोध लागला. ही इकोसिस्टीम 299 दशलक्ष ते 252 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या पेर्मियन काळातील होती. या काळात तापमानात वेगाने वाढ होऊ लागली होती व त्या काळात पृथ्वीवरील 90 टक्के प्रजातींचा विनाश झाला. त्यामुळे या काळाला ‘ग्रेट डाईंग’ असेही म्हटले जाते. याठिकाणी सरीसृप, उभयचर, कीटक आणि संधिपाद प्राण्यांच्या पावलांचे ठसे आढळून आले. याशिवाय प्राचीन काळातील झाडांची पाने, खोड व बियांचेही जीवाश्म आढळले. याठिकाणी प्रागैतिहासिक काळात एक सरोवर होते व त्याच्या काठावर असलेल्या चिखलात हे ठसे उमटले होते. आता तिथे जे वालुकाश्म किंवा वाळूपासून बनलेले दगड आहेत ते त्या काळात वाळूच्या स्वरूपात होते व त्यावर ही पावले उमटली होती. ती कालांतराने कोरड्या वालुकाश्मावर कायम राहिली.