जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा सामना रंगला.pudhari file photo
Published on
:
25 Nov 2024, 3:46 am
Updated on
:
25 Nov 2024, 3:46 am
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकराही जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे. यामध्ये सर्वात जास्त विजयश्री घेतलेले गिरीश महाजन व त्यानंतर गुलाबराव पाटील हे आहेत. जिल्ह्यामध्ये प्रथमच निवडून येणारे रावेर भाजप तर एरंडोल महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे यंदा जळगाव जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री पदासाठी कोणाकोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यामुळे मंत्रिपदाकडे अनेक आमदारांचे लक्ष लागलेले आहे. गेल्या वेळच्या मंत्र्यांच्या रांगेत अनेक नावे सहभागी होण्याची संभाव्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये जामनेर विधानसभा क्षेत्राचे गिरीश महाजन हे सलग सातव्यांदा विजयी झालेले आहेत. यानंतर पूर्वीची शिवसेना व आताच्या शिंदे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना पाचव्यांदा विजयश्री मिळवली आहे. यानंतर भुसावळचे उमेदवार संजय सावकारे हे चौथ्यांदा सलग विजय झालेले आहेत .मात्र यामध्ये सुरुवातीच्या 2009 ची निवडणूक हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस व त्यानंतरच्या तीन हे भाजपाच्या तिकिटावर विजयी झालेले आहेत.
जळगाव शहराचे सुरेश भोळे ऊर्फ राजू मामा यांनी आपल्या विजयाची सुरुवात जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांचा पराभव करून सुरुवात केली. ते सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून पुढे आले आहेत.
पाचोर्याचे तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान शिंदे शिवसेनेचे उमेदवार किशोर अप्पा पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत.
जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याचा मान हा चाळीसगावचे भाजपचे मंगेश चव्हाण व पाचोरा शिवसेना शिंदे गटाचे किशोर अप्पा पाटीलआहेत. 2014 व 2024 असे दुसऱ्यांदा निवडलेले चोपड्याचे तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार व आताचे शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे उमेदवार चंद्रकांत पाटील आहेत.
जिल्ह्यात प्रथमच निवडणुकीत उतरलेले भाजपचे अमोल जावळे व शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले अमोल पाटील हे सुद्धा चांगल्या मतांनी विजयी झालेले आहेत.
कॅबिनेट मंत्रीपदामध्ये जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव पाटील, गिरीष महाजन व आमदार अनिल भाईदास पाटील हे तर राहतील. तर दुसरीकडे भाजप चाळीसगावचे मंगेश चव्हाण, जळगावचे सुरेश भोळे, भुसावळचे संजय सावकारे तर शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा किशोर अप्पा पाटील व मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील हे मंत्रीपदाच्या रेसमध्ये राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील अनेकांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा सुरू आहे.