काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सवरील एपिसोड मोठय़ा प्रमाणात लीक झाल्याची घटना घडली होती. त्यामध्ये टर्मिनेटर झीरो, आर्पेन, स्क्विड गेम, रणमा1/2 यासारख्या लोकप्रिय शोंचा समावेश होता. या शोंचे एपिसोड नेटफ्लिक्सवर येण्यापूर्वीच लीक झाले होते. या घटनेनंतर नेटफ्लिक्सने एक निवदेन जारी करून दोषींविरोधात सक्रिय कारवाई करत असल्याचे सांगितले. आता शो लीकप्रकरणी नेटफ्लिक्सच्या हाती काही पुरावे आल्याचे समजते. आपल्या ब्लॉकबस्टर शोचे अप्रकाशित फुटेज लीक करणाऱया व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नेटफ्लिक्स आता ‘डिकॉर्ड’ची मदत घेत आहे. अप्रकाशित फुटेज नेमके कोण लीक करत आहे, त्याचा आता शोध घेतला जाणार आहे.
अलीकडेच कॅलिफोर्निया उत्तर जिल्हा कोर्टाने ‘डिकॉर्ड’ला समन्स पाठवून माहिती शेअर करायला सांगितली. याद्वारे जे ‘डिकॉर्ड’चे युजर्स शो लीक करत आहेत त्यांची माहिती शोधली जाणार आहे.
‘स्क्वीड गेम’ हा शो रिलीज होण्यापूर्वीच त्याचा कंटेट एका डिस्कोर्ड युजरने पोस्ट केला होता. त्यामुळे आता नेटफ्लिक्सने ‘डिकॉर्ड’कडे मदत मागितली आहे. हे लीक प्रकरण ऑगस्टमध्ये घडले होते.
या शोंचे पोस्ट प्रोडक्शन ज्या ल्युनो स्टुडियोमध्ये झाले होते, त्या ल्युनो स्टुडियोतून सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलंय. नेटफ्लिक्सच्या व्यतिरिक्त अॅमेझॉन स्टुडियो, बीबीसी, डिस्ने, एचबीओ आणि ड्रीमवर्क्स असे ‘ल्युनो’चे अनेक ग्राहक आहेत.