Published on
:
25 Nov 2024, 3:51 am
Updated on
:
25 Nov 2024, 3:51 am
नाशिक : महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेत राज्यातील विविध मतदाून विजयी झालेल्या २२ महिला उमेदवार प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला आमदारांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच जणींचा समावेश आहे.
राज्यामध्ये २८८ विधानसभा मतदारसंघांचे निकाल शनिवारी (दि. २३) घोषित करण्यात आले. निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश संपादन करत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. यंदाच्या निवडणुकीचे अजून वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी २२ महिला लोकप्रतिनिधींना जनतेने विधानसभेत पाठविले. या महिला आमदारांमध्ये नाशिक जिल्ह्यातून भाजपच्या तिकिटावर नाशिक मध्य मतदारसंघातून विजय संपादन केलेल्या प्रा. देवयानी फरांदे तसेच नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांनी तिसऱ्यांदा विधानसभा गाठली. देवळालीमधून अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांनी दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली. या व्यतिरिक्त शेवगाव (जि. अहिल्यानगर) येथून भाजपच्या मोनिका राजोळे तसेच साक्री (जि. धुळे) येथून शिवसेनेच्या मंजुळा गावित यांनी सलग दुसरा विजय मिळविला.
विधानसभा निवडणुकीत विदर्भातून तीन, मराठवाड्यातून चार, मुंबईसह कोकण विभागातून आठ तसेच पश्चिम महाराष्ट्रामधून दोन महिला विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत. दरम्यान, १४ व्या विधानसभेत राज्यातील २४ महिलांनी प्रतिनिधित्व केले. पण, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यंदा २२ महिलांनाच मतदारांनी संधी दिली. या सर्व महिला लाेकप्रतिनिधींना राज्यातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार तसेच अन्य समस्या सोडविण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
भाजपकडून सर्वाधिक प्रतिनिधित्
राज्याच्या विधानसभेत १३२ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत १८ महिलांना तिकीट दिले होते. त्यापैकी १५ महिलांनी बाजी मारली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार, शिवसेना शिंदे पक्षाच्या दोन व काँग्रेसकडून एका महिला आमदाराने विजयश्री खेचून आणली तसेच राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाकडून एकही महिला उमेदवार विजयी झालेली नाही.
राज्यात २२ महिलांनी विजयश्री मिळविली असून, त्यातील काही महिला लोकप्रतिनिधींची ही तिसरी व चौथी टर्म आहे. या लोकप्रतिनिधी मंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. नाशिकमध्ये आ. देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची सलग तिसरी टर्म आहे. या दोघींमधून एकीच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आता मंत्रिमंडळ शपथविधीकडे लागले आहे.
कोकण विभाग : ०८
उत्तर महाराष्ट्र : ०५
मराठवाडा विभाग : ०४
विदर्भ विभाग : ०३
पश्चिम महाराष्ट्र : ०२
-----