Published on
:
21 Nov 2024, 11:37 pm
Updated on
:
21 Nov 2024, 11:37 pm
धारवाड : मातांनीच दोघांच्या सहकार्याने आपल्या मुलांचे अपहरण केल्याचा प्रकार बुधवारी विद्यागिरी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मातांसह चौघांना अटक केली असून, सहा मुलांची सुटका केली आहे. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेश्मा सांबरानी, प्रियांका सांबरानी (दोघीही रा. टोलनाका, धारवाड), सुनील करिगार (रा. भुसाप्पा चौक, धारवाड) व मुत्तुराज बी. (रा. शिकारीपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, तर मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रेश्मा व प्रियांका सांबरानी कुटुंबाच्या सुना आहेत. सांबरानी (वय 10), सूरज (7), सिंचना (6), सान्वी (7), सात्विक (6) आणि मन्वित (3) या मुलांना शाळेत सोडण्यासाठी दोघीही 5 नोव्हेंबर रोजी घराबाहेर पडल्या होत्या. तेव्हापासून त्या गायब होत्या. त्यामुळे रेश्माचे पती दीपक सांबरानी यांनी त्याच दिवशी विद्यागिरी पोलिस स्थानकात पत्नी, भावजय व मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर मुलांच्या वडिलांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. पलीकडून बोलणार्या व्यक्तीने मुलांच्या सुटकेसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. पोलिसांनी लागलीच सतर्क होत बेपत्ता मुलांच्या सुटकेसाठी कारवाई सुरू केली होती.
पोलिसांनी हैदराबाद, महाराष्ट्र व बंगळूरला पथके पाठवून शोध सुरू केला होता. अखेरीस बंगळूरमधील अत्तिगेरे या ठिकाणी दोन्ही माता व मुले आढळून आली. त्यांच्यासोबत सुनील व मुत्तुराजही होते. पोलिस निरीक्षक संगमेश दिंडिगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्वांना धारवाडला आणून चौकशी सुरू केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुत्तुराजने सांबरानी कुटुंबाला खंडणीसाठी फोन केल्याचे उघडकीस आले. रेश्माचे सुनीलशी, तर विधवा प्रियांकाचे शिकारीपूरमधील मुत्तुराजशी अनैतिक संबंध होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सांबरानी कुटुंबाने या संबंधांना विरोध केला होता. यावरून या दोघीही घरात भांडण काढून मुलांना सोडून निघून जाण्याची धमकी देत होत्या, असे चौकशीत आढळून आले.