Published on
:
25 Nov 2024, 4:08 am
Updated on
:
25 Nov 2024, 4:08 am
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला स्पष्ट आणि विक्रमी बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. सोमवारी (दि. २५) नव्या सरकारचा शपथविधी होणार असून, त्यात नाशिकमधून तब्बल सहा चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रीपदासाठी मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ यांची नावे निश्चित मानली जात असून, आमदार डॉ. राहुल आहेर आणि हॅट्ट्रिक साधलेल्याआमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांचीही नावे चर्चेत असल्याने नाशिकला यावेळी मंत्रिपदाचा षटकार लागण्याची शक्यता आहे.
महायुतीने जिल्ह्यात लढलेल्या १४ ही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपले गड राखले असून, मंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांची नावे निश्चित मानली जात आहेत. दुसरीकडे देवळा - चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर हेदेखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असणार आहेत. प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आहेर यांना मंत्रिपद देणार असल्याचे संकेत दिले होते. २० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्यास कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, असा शब्द फडणवीस यांनी दिला होता. डॉ. आहेर यांना तब्बल ४८ हजार ५४३ इतके मताधिक्य मिळाल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दिलेला शब्द खरा ठरतोय काय? याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे मोठ्या मताधिक्याने हॅट्ट्रिक साधलेल्या आमदार सीमा हिरे यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. तसेच नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यादेखील शर्यतीत असल्याने नाशिकच्या वाट्याला सहा मंत्रिपदे येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री दादा भुसे यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी बराच काळ नाशिकचे पालकमंत्रिपद भूषविले आहे, तर मागील अडीच वर्षांपासून दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते. दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्वाधिक सात जागा निवडून आल्याने, अजित पवार गटाकडून नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी जोर लावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये पालकमंत्री पदी भुजबळ की भुसे? याकडे लक्ष लागून आहे.
छगन भुजबळ
दादा भुसे
नरहरी झिरवाळ
Maharashtra assembly election 2024Pudhari News network
तर मंत्रीपदाच्या नावासाठी हे चर्चेत
डॉ. राहुल आहेर
प्रा. देवयानी फरांदे
सीमा हिरे