परराज्यातून आवक घटल्याने फळभाज्या महागल्याpudhari
Published on
:
25 Nov 2024, 4:02 am
Updated on
:
25 Nov 2024, 4:02 am
Pune: लहरी हवामानामुळे परराज्यात फळभाज्यांच्या उत्पादन घट झाली आहे. त्यामुळे, तेथील स्थानिक बाजारपेठांसह शहरातील बाजारपेठेतही कांदा, बटाटा, लसूण, भेंडी, गवार, कोबी अन् शेवग्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने या फळभाज्यांच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. याउलट आवक वाढल्याने घेवडा व मिरचीच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी (दि. 24) राज्यासह परराज्यातून 90 ते 100 ट्रक शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. परराज्यातून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून हिरवी मिरची 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा 2 ते 3 टेम्पो, इंदौर येथून 4 ते 5 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून 50 गोणी भुईमूग शेंग, मध्यप्रदेश येथून मटार 10 ते 12 ट्रक व मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 7 ते 8 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सात ते आठ हजार पेटी, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 ट्रक तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 ट्रक आवक झाली.
कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, करडईचे भाव वधारले
मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे पालेभाज्या महागल्या आहेत. घाऊक बाजारात सर्वाधिक कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. तर मेथी, शेपू, कांदापात, मुळे आणि पालक पाच रुपये, चुका दोन रुपये, तर करडई, चवळई आणि अंबाजीच्या भावातही जुडीमागे प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मेथीच्या जुडीची 40 रुपयांनी, तर कोथिंबिरीची 30 रुपयांनी विक्री होत आहे. घाऊक बाजारात रविवारी (दि. 24) कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची 40 हजार जुडींची आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे.